कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल जाहीर; डेल्टा व्हेरिएन्टवर इतकी प्रभावी

भारतातील कोरोना वॅक्सिन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Jul 3, 2021, 08:33 AM IST
कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल जाहीर; डेल्टा व्हेरिएन्टवर इतकी प्रभावी title=

मुंबई : भारतातील कोरोना वॅक्सिन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकने त्यांची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनच्या चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यातील ट्रायलचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले आहेत. त्यांच्या मते, कोवॅक्सिन कोरोनाविरूद्ध 77.8% प्रभावी असल्याचं आढळलं आहे. तर धोकादायक अशा डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याची माहिती आहे.

कोव्हॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत एकूण 24,419 लोकांना समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यापैकी 12,221 लोकांना मूळ लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते. आणि 12,198 लोकांना प्लेसिबो देण्यात आली होती.

कोरोना विषाणूच्या गंभीर संसर्गामुळे पीडित लोकांसंदर्भात बोलायचं झालं तर, कोव्हॅक्सिन त्यांना 93.4% प्रभावी असल्याचं आढळलं आहे. अधिकृत निकाल जाहीर करताना कंपनीने म्हटले आहे की, तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत भाग घेणाऱ्या 16,973 लोकांचे दोन्ही डोस (वास्तविक लस किंवा प्लेसिबो) दिल्यानंतर किमान 2 आठवड्यांसाठी त्यांचं परीक्षण केलं गेलं.

या पाठपुराव्यामध्ये असं आढळलं की, 130 स्वयंसेवकांना कोविड संसर्ग झाला, त्यापैकी 24 जण असे होते ज्यांना मूळ लसीच्या दोन्ही डोसांनंतर कोरोनाची लागण झाली होती, तर 124 स्वयंसेवकांना प्लेसिबो घेतल्यानंतर कोविड झाला होता.

त्याचप्रमाणे, कोविडचं गंभीर संक्रमण झालेल्या 16 स्वयंसेवकांपैकी केवळ 1 व्यक्तीला मूळ लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते. आणि उर्वरित 15 जणांना प्लेसिबो देण्यात आलं होतं. या चाचणीत असंही आढळले आहे की, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोव्हॅक्सिन 67.8% प्रभावी आहे आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी 79.4% प्रभावी आहे.

चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण 99 स्वयंसेवकांमध्ये गंभीर दुष्परिणाम देखील दिसून आले. यापैकी 39 स्वयंसेवक मूळ लस घेणारे होते तर 60 प्लेसिबो घेणारे होते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत भाग घेतलेले 15 स्वयंसेवकांचा मृत्यूही झाला. यासंदर्भात, कंपनीने असा आग्रह धरला की यापैकी कोणत्याही स्वयंसेवकांच्या मृत्यूचं कारण लस किंवा प्लेसिबोच्या दुष्परिणामामुळे झाले नाही.