कोविड पॉझिटीव्ह माता स्तनपान देऊ शकते; या गोष्टी पाळणं बंधनकारक

जर मातेला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर अशावेळी स्तनपान देणं सुरक्षित आहे. 

Updated: Jul 28, 2021, 11:59 AM IST
कोविड पॉझिटीव्ह माता स्तनपान देऊ शकते; या गोष्टी पाळणं बंधनकारक title=

मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत देशातील नागरिक चिंतेत आहेत. तर दुसरीकडे नवजात बालकांना घेऊन नवमाता देखील काळजीत आहेत. स्तनपान देणाऱ्या मातांना स्तनपान द्यायचं की नाही हा प्रश्न मनात होता. मात्र आता अखेर केंद्रीय मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण देत नवमातांची चिंता दूर केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून स्तनपान हा आई आणि नवजात बाळ यांच्यासाठी एक चिंतेचा विषय ठरला होता. मात्र आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, जर मातेला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर अशावेळी स्तनपान देणं सुरक्षित आहे. 

कोरोना, लस आणि स्तनपान याबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न होते. गरोदर महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही, लस घेतल्यानंतर स्तनपान द्यावं की नाही तसंच कोरोनाचा संसर्ग झाला असता स्तनपानामुळे बाळाला संसर्ग होण्याचा धोका आहे का अशा प्रश्नांवर अखेर केंद्रीय मंत्रालयाने उत्तर दिलंय. 

केंद्राच्या म्हणण्याप्रमाणे, आईला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर बाळ स्तनपानापासून वंचित राहू नये. परंतु, स्तनपानाव्यतिरिक्त बाळाला आईपासून दूर ठेवलं पाहिजे. त्याचनुसार योग्य ती काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना पॉझिटीव्ह माता बाळाला दूध पाजू शकतो. यामध्ये मातेने काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये स्तनपान देताना आईने मास्क घालणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे हात धुवून नीट स्वच्छ करून बाळाला दूध पाजावं. शिवाय शक्य असेल तितकं बाळाला लांब ठेवावं.