63 वर्षीय रुग्णाच्या आतड्यात आढळली उडणारी अख्खी माशी; डॉक्टर हैराण, प्रवास कसा केला हे रहस्य

63 वर्षीय रुग्णाला जेव्हा आपल्या शरिरात एक माशी वास्तव्य करत असल्याचं समजलं तेव्हा तोही चक्रावला. त्याला शरीरात कीटक कसा आला याची कल्पनाच नाही.  

शिवराज यादव | Updated: Nov 24, 2023, 05:57 PM IST
63 वर्षीय रुग्णाच्या आतड्यात आढळली उडणारी अख्खी माशी; डॉक्टर हैराण, प्रवास कसा केला हे रहस्य title=

कोलोनोस्कोपी दरम्यान एका रुग्णाच्या आतड्यांमध्ये पूर्णपणे अखंड माशी आढळून आल्याने अमेरिकेतील डॉक्टर चक्रावले आहेत. अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये (American Journal of Gastroenterology) हा रिपोर्ट छापून आला आहे. त्यानुसार मिसुरीमध्ये एक 63 वर्षीय व्यक्ती नियमित कोलन तपासणीसाठी गेला होता. तपासणी करताना सर्वकाही सामान्य वाटत असतानाच डॉक्टर मोठ्या आतड्याच्या वरच्या भागापर्यंत पोहोचले असता चक्रावले. कारण तिथे एक अखंड माशी होती. "हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आहे. माशीने ट्रान्सव्हर्स कोलनपर्यंत प्रवास कसा केला ही आश्चर्याची आणि रहस्यमय बाब आहे," युनिव्हर्सिटी ऑफ मिसूरी स्कूल ऑफ मेडिसिनच्या डॉक्टरांनी जर्नलमध्ये लिहिलं आहे.

डॉक्टरांइतकाच 63 वर्षीय रुग्णालाही जेव्हा आपल्या शरिरात एक माशी वास्तव्य करत असल्याचं समजलं तेव्हा धक्का बसला. त्यांना शरीरात कीटक कसा आला याची कल्पनाच नाही. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की, या प्रक्रियेपूर्वी आपण फक्त द्रवपदार्थांचं सेवन केलं होतं. तसंच दोन दिवस आधी पिझ्झा आणि लेट्यूस खाल्लं होतं. पण हे खात असताना कोणत्याही अन्नावर माशी होती असं मला आठवत नाही. डॉक्टरांनीही रुग्णाने माशी खाल्ल्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती असं सांगितलं. 

जर्नलमध्ये लिहिलं आहे त्यानुसार, "माशी स्वत:हून हालचाल करत नव्हती". दरम्यान द इंडिपेंडंटशी बोलताना, मिसूरी विद्यापीठातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे प्रमुख मॅथ्यू बेचटोल्ड म्हणाले की त्यांनी आणि इतर डॉक्टरांनी माशी मृत असल्याची पुष्टी केली आहे.

"जर माशी आतड्यांपर्यंत पोहोचली असेल तर तिने उडण्यासाठी एखादं छिद्र तयार करुन प्रवास केला असेल. अंधार आणि कमी जागा यामुळे ती मध्यापर्यंत पोहोचली असावी. पण तशीही शक्यता कमी दिसत आहे," असंही त्यांनी सांगितलं. 

दुर्मिळ प्रकरणांमध्ये आतड्यांसंबंधी मायियासिस नावाच्या स्थितीत माशी आणि त्यांच्या अळ्या मानवी आतड्यांमध्ये संसर्ग करतात. पण जर लोकांनी माशीची अंडी आणि अळ्या असलेलं अन्न खाल्लं असेल तर क्वचितच अंडी पोटातील आम्ल आणि उबवणुकीतून जगू शकतात आणि नंतर शरीरात वाढू शकतात, असं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन सांगते.