Cracking Knuckles Side Effects: बसल्या बसल्या तुम्हालाही बोटं मोडण्याची सवय आहे का? आळस देताना बोट मोडण्याचा कडकड आवाज आला की समजायचे आता आळस दूर झाला आहे. काम करता करता ही नकळतपणे बोट मोडतात. काही जणांना तर बोटं मोडल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. थोड्या-थोड्यावेळाने हाता-पायाची बोटं मोडल्याशिवाय चैन मिळत नाही. पण बोटं मोडण्याची ही सवय योग्य आहे का? यामुळं आपल्या शरीरावर काय विपरीत परिणाम होतो? यामुळं सांधेदुखीचा आजार मागे लागू शकतो का? याची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. (Fingers Cracking)
आपल्या शरिरात असलेल्या जॉइंट्समध्ये एक फ्लुइड असते. ज्याला साइनोवियल फ्लुइड म्हणतात. जेव्हा तुम्ही बोटं मोडता तेव्हा त्या जॉइंट्समध्ये असलेल्या फ्लुइडमधून गॅस बाहेर जातो. त्यामुळं बोट मोडल्याने आवाज येतो. बोटं मोडल्यानंतर तुम्ही लगेचच पुन्हा बोटं मोडायला गेलात की तेव्हा मात्र आवाज येत नाही. पुन्हा बोटं मोडल्याचा आवाज येण्यासाठी तुम्हाला साधारण 20 मिनिटे वाट पाहावी लागणार आहे.
एका अहवालानुसार, वारंवार बोटं मोडल्याने त्यातील Synovial Fluid कमी व्हायला लागते. हे Synovial Fluid शरीरात ग्रीसिंगसारखे काम करते. जर हे फ्लुइड कमी झाले तर हळूहळू संधीवाताचे दुखणे वाढू लागेल. वयोमानानुसार हा त्रास जास्त वाढत जातो.
काही जणांच्या मते, सतत बोटं मोडल्याने आर्थरायटिसची समस्या निर्माण होते. मात्र काही तज्ज्ञांनी हा दावा फेटाळला आहे. काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बोटं मोडल्याने आर्थरायटिस होत नाही. पण काही रिसर्चमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की यामुळं गुडघेदुखी सुरू होऊ शकते. त्यामुळं बोटं मोडण्याची सवय जितकी कमी असेल तितकच तुमच्या आरोग्यासाठी जास्त लाभदायक असेल.
एका अभ्यासानुसार असे ही दिसून आले आहे की, सतत बोट मोडल्याने हाताला सूजदेखील येऊ शकते. तसंच, सॉफ्ट टिश्यूजमध्येदेखील सूज येऊ शकते. बोटं मोडणे चांगले की वाईट याबाबत मतमतांतरे आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते बोट मोडल्याने बोटं अधिक कमजोर होऊ शकतात, असाही दावा केला आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)