मुंबईत गोवरमुळे 8 मृत्यू, राज्यभरात संशयित रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत 8 मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

Updated: Nov 17, 2022, 10:35 PM IST
मुंबईत गोवरमुळे 8 मृत्यू, राज्यभरात संशयित रुग्णांची संख्या वाढली title=

मुंबई : मुंबईकरांसाठी धक्कादायक बातमी आहे. कारण मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत 8 मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी केवळ एका बालकाने गोवरचा डोस घेतला होता. बाकीच्या 7 मृत बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती. 

राज्यातील संशयित रुग्णांची संख्या 6 हजार 521 वर पोहोचली आहे. त्यामध्ये मुंबईतील 1 हजार 259 संशयित रुग्णांचा समावेश आहे. मुंबई पाठोपाठ भिवंडी आणि मालेगावमध्ये गोवरच्या साथीचा उद्रेक झालाय. 

गोवरची साथ रोखण्यासाठी कम्युनिटी लीडर्सची मदत घेतली जाणार आहे. कम्युनिटी लीडर्सशी संपर्क साधून गल्ल्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन गोवरच्या साथीचा आढावा घेतला. गोवरग्रस्त मुलं, त्यांचे पालक आणि डॉक्टरांशी त्यांनी बातचीत केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुंबईतील गोवर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.