close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तुम्हालाही विसरण्याची सवय आहे? तर हे नक्की वाचा...

नेहमी विसरण्याची सवय असेल तर त्यावर दररोज व्यायाम आणि काही घरची दैनंदिन जीवनातील कामे करूनही आपली स्मरणशक्ती उत्तम ठेवली जाऊ शकते

Updated: Jan 24, 2019, 05:08 PM IST
तुम्हालाही विसरण्याची सवय आहे? तर हे नक्की वाचा...

वॉशिंग्टन : अनेकदा एखादी गोष्ट ठेवल्यानंतर ती विसरण्याची सवय असते. या सवयीमुळे बऱ्याचदा कामाच्या वेळी गोष्टी लक्षात येत नाही आणि त्यामुळे मोठी पंचाईत होते. परंतु या विसरण्याच्या सवयीवर तुम्ही मात करू शकता. व्यायाम हा एकमेव असा पर्याय आहे ज्याने अनेक गोष्टी सुरळीत होऊ शकतात. एखाद्याला नेहमी विसरण्याची सवय असेल तर त्यावर दररोज व्यायाम आणि काही घरची दैनंदिन जीवनातील कामे करूनही आपली स्मरणशक्ती उत्तम ठेवली जाऊ शकते. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, प्रकृती स्वास्थ्य सुधारण्यासाठी तसेच मेंदूवर संरक्षणात्मक परिणाम होण्यासाठी व्यायामासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही.

अमेरिकेतील रश विद्यापीठातील के. एरोन. एस. बुचमॅन यांनी सांगितले की, या संशोधनात भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या सरासरी दोन वर्ष आधी त्यांच्या शारीरिक क्रियांचे मूल्यांकन केले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर दान केल्या गेलेल्या मेंदूच्या पेशींचा अभ्यास केला गेला. या अभ्यासातून त्यांनी सक्रिय जीवनशैलीचा मेंदूवर संरक्षणात्मक प्रभाव पडत असल्याचे स्पष्ट केले.  

संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा शरीरात अल्झायमर आजाराची लक्षणे दिसू लागतात त्यावेळी शरीराला सक्रिय ठेवणे गरजेचे असते. शरीर सक्रीय ठेवल्याने स्मरणशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. त्यामुळे दररोज व्यायाम आणि दैनंदिन कामे केल्यास शरीरासह मेंदूही सक्रीय राहतो. मेंदू सक्रीय असल्यास स्मरणशक्ती उत्तम राहून विसरण्याची सवयही जाऊ शकते.