Happy Hug Day: मिठी मारा, हृदय निरोगी ठेवा

कसं, ते एकदा वाचाच.... 

Updated: Feb 12, 2020, 11:22 AM IST
Happy Hug Day: मिठी मारा, हृदय निरोगी ठेवा title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर आनंदाच्या भरात लगेचच आलिंगन दिलं जातं. अर्थात मिठी मारली जाते. आनंद, दु:ख किंवा अशाच कोणत्याही भावनेला व्यक्त करण्यासाठी आपल्या मनाच्या जवळ असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हमखास मिठी मारली जाते. अगदी सहजपणे मारली जाणारी ही मिठी, म्हणजे जणू अनेकदा आपली तारणहारही ठरते. पण, तुम्हाला माहितीये का? याच मिठीचे काही महत्त्वपूर्म फायदेही आहेत. दिवसातून किमान चार वेळा मिठी मारणं अतिशय लाभदायी ठरु शकतं. 

आता हे काय नवं, याचं स्पष्टीकरण एकदा वाचाच.... 

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार फॅमिली थेरेपिस्ट व्हर्जिनिया सॅटिर यांच्या म्हणण्यानुसार दर दिवशी आपण कमीत कमी चार वेळा मिठी मारणं आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात मिठी मारण्याच्या फायद्याविषयी सांगावं तर, रोज आठ ते बारा वेळा मिठी मारणं अतिशय फायद्याचं. काही राष्ट्रांमध्ये तर, कडलिस्ट असा एक नवा पेशाही समोर आला आहे. ज्यामध्ये पैसे आकारून लोकांना मिठी मारली जाते. आहे की नाही हे रंजक? 

मिठी मारल्यामुळे मेंदूही तल्लख होतो. जेव्हा पालक त्यांच्या मुलांना मिठी मारतात तेव्हा मुलांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचं आकलन करण्यात अडचण येत नाही. जे पालक त्यांच्या मुलांना मिठी मारतात ती मुलं मिठी न मारणाऱ्या मुलांच्या तुलनेत अधिक बुद्धिवान असतात असं एका निरिक्षणात सिद्ध झालं आहे. 

मिठी मारण्याचे आणखी काही फायदे... 

तणाव कमी - 
मिठी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावापासून दूर राहता येतं. शिवाय एकटेपणाही सतावत नाही. आपण जेव्हा कोणाला मिठी मारतो तेव्हा स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टीसोलचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे मानसिक शांतता मिळते. 

हृदय निरोगी - 
शरीरातील  स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टीसोलच रक्तदाब वाढवण्याचं काम करतात. ज्यामुळे हृयाचे विकार जडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत निरिक्षणातून हे सिद्ध झालं आहे की, दैनंदिन जीवनात मिठी मारल्यामुळे तुमच्यातील कॉर्टीसोलचं प्रमाण कमी होतं आणि अशा प्रकारे तुम्ही सहजपणे हृदयरोगांपासून दूर राहता. 

थकवा दूर - 
कोणाही व्यक्तीला मिठी मारतेवेळी शरीरातील मांसपेशी पसरतात. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्यामुळे थकवा जाणवत असल्यास मिठी मारल्यामुळे तोसुद्धा दूर पळून जातो. 

मिठी मारण्याचे हे फायदे पाहता, अरेच्चा .... ही तर जादूच म्हणावी अशीच प्रतिक्रिया तुमच्याही मनात येतेय ना? विचार कसला करताय, Valentines week व्हॅलेंटाईन्स वीकच्या निमित्ताने आज, Hug Dayचं औचित्य साधत होऊन जाऊ दे एक 'जादू की झप्पी'.