Heart Attack's Silent Symptoms : भारतात हार्ट अटॅकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2022 मध्ये भारतात हार्ट अटॅकने 32,457 लोक मरण पावले. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 12.5 टक्क्यांनी वाढले होते आणि दरवर्षी वाढत आहे. पण हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. यातच अलीकडेच एक नवीन संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की कानात वेदना होणे आणि जडपणा जाणवणे हे हार्ट अटॅकचे एक लक्षण (Silent Symptoms) असू शकते. जे आपल्याला पटकन समजून येत नाही. अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) ने प्रकाशित केलेल्या संशोधनात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
या संशोधनानुसार, हार्ट अटॅकच्या दरम्यान रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, पण यामुळे फक्त हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होत नाही, तर या गुठळ्या कानाच्या नसांपर्यंतही पोहोचू शकतात. त्यामुळे कान दुखणे, कानात जडपणा वाटणे किंवा कमी ऐकू येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
संशोधकांनी 500 हून अधिक हृदयरोगींचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांपैकी 12 टक्के रुग्णांना कानात वेदना जाणवणे, काहींना कानात जडपणा वाटणे किंवा कमी ऐकू येणे यासारख्या समस्या जाणवत होत्या.
या संशोधनातील प्रमुख संशोधक डॉ. डेव्हिड मिलर यांच्या मते, कानात दुखणे किंवा जडपणा जाणवणे हे हार्ट अटॅक येण्याचे संभाव्य लक्षण असू शकते. विशेषत: जेव्हा हा त्रास अचानक आणि कोणत्याही कारणाशिवाय होतो. अशा परिस्थितीत लगेच डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. मिलर यांनी असेही सांगितले की कान दुखणे किंवा जड होणे हे हार्ट अटॅकचे एकमेव लक्षण नाही. कानात कोणता संसर्ग होणे, सायनस किंवा मायग्रेन यांसारख्या इतर समस्यांचेही हे एक लक्षण असू शकते. त्यामुळे अशा वेळी नेमके काय झाले आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
या संशोधनातून असेही दिसून आले आहे की काही वेळा छातीत दुखणे किंवा श्वास लागणे यासारखी हार्ट अटॅकची सामान्य लक्षणे आढळत नाहीत. पण अशा वेळी कान दुखणे आणि कानात जडपणा जाणवणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. विशेषत: वृद्ध आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये ही हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. डॉक्टर मिलर म्हणतात की हार्ट अटॅकबद्दल जागरूकता वाढवणे आणि लोकांना याच्या पटकन लक्षात न येणाऱ्या (Silent Symptoms) लक्षणांबद्दल जागरूक करणे महत्वाचे आहे. ज्यामुळे योग्य वेळेत डॉक्टराचा सल्ला आणि उपचार घेणे शक्य होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)