Fruits You Should Never Refrigerate: ऑफिसला जाणाऱ्या महिला किंवा गृहिणी बऱ्याचदा एकदाच आठवड्यासाठी लागणाऱ्या भाज्या व फळे घरी घेऊन येतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. पण फळे फ्रीजमध्ये ठेवणे खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का, जाणून घेऊयात.
फ्रीज हा आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात एकाचवेळी अनेक कामे करण्याची सवय लागून राहिली आहे. अनेकदा एकाच दिवशी आठवड्याभराच्या भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. मात्र, काही फळे फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाहीये.
आरोग्यासाठी फ्रीजमध्ये अनेक दिवस ठेवलेले पदार्थ खाणे चांगले नसते. अशातच काही फळे फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक असते. कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात आणि मग ती फळे खाण्याचा काहीच फायदा होत नाही.
केळी चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्यास केळी काळी पडू शकतात आणि लवकर खराब होतात. या फळातून इथाईलीन नावाचा गॅस निघतो यामुळं दुसरी फळेदेखील लवकर पिकतात.
सफरचंद पौष्टिक फळ आहे, असे म्हणतात की जर तुम्ही रोज एक सफरचंद खाल्ले तर तुम्हाला कधीच डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. पण जर तुम्ही सफरचंद फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण जर सफरचंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आवश्यक असेल तर ते कागदात गुंडाळून ठेवा
टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्याचा आकार बराच मोठा असल्याने आपण ते एकाच वेळी खाऊ शकत नाही, म्हणून आपण काही भाग कापून फ्रीजमध्ये ठेवतो. पण असे केल्याने या फळातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात.
लिची हे देखील एक असे फळ आहे की जर ते जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवले तर ते आतून सडू लागते आणि त्यातील पोषक तत्वे नाहीसे होऊ लागतात, त्यामुळे त्याच दिवशी सेवन करावयाचे असेल तेव्हाच बाजारातून आणा.
आंबा लवकर पिकल्यानंतर खराब होऊ शकतो म्हणून आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो, परंतु असे केल्याने आंब्यातील पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स कमी होऊ लागतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)