Side Effects of Wrong Tooth Brushing: शरीराच्या आरोग्याबरोबरच मौखिक आरोग्याची निगा राखणेदेखील खूप गरजेचे आहे. दातांचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज टुथब्रश वापरतात. रोज सकाळी आणि रात्री दात घासणे खूप गरजेचे आहे. डॉक्टरदेखील दातांची काळजी घेण्यासाठी वारंवार बजावतात. दातांचे आरोग्य राखणे म्हणजे फक्त ब्रश करणे नाही तर अजूनही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण जो टुथब्रश वापरतो त्याबाबतही सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. टुथब्रश कसा वापरावा आणि किती काळ वापरावा, याची माहिती जाणून घ्या.
दातांची योग्य प्रकारे स्वच्छता राखणे गरजेचे आहे. टुथब्रश दोन ते तीन महिन्यांनी बदलणे खूप गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त लहान मुलांचा टुथब्रश 2 महिन्यांनी बदलणे खूप गरजेचे आहे. इतकंच, नव्हे तर तुमचा टुथब्रश कधीच कोणासोबत शेअर करु नका.
रोजच्या वापरातील टुथब्रश हा पातळ व मऊ ब्रिसल्स असलेला वापरा. कारण असे टुथब्रश दातांसाठी खूप चांगले असतात. तसंच, तुम्ही रोज वापरत असलेला ब्रश स्वच्छ ठिकाणी आणि टुथब्रशला कॅप लावून ठेवणे गरजेचे आहे.
जर तुम्ही वर्षानुवर्षे एकच ब्रश वापरत असाल तर ते तुमच्या दातांसाठी व मौखिक आरोग्यासाठीदेखील नुकसानदायक आहे. वेळेत ब्रश बदलला नाही तर तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. त्याव्यतिरिक्त दात चांगल्या प्रकारे स्वच्छ होत नाहीत. त्यामुळं दातांसंबंधी आजार सुरू होतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज 2-3 मिनिटांपर्यंत दातांना ब्रश करणे गरजेचे आहे. कारण दातावर अन्नाचे कण आणि प्लाकचा थर पूर्णपणे निघून जाणे गरजेचे आहे. त्यामुळं 2-3 मिनिटे ब्रश करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर हळुवार ब्रश करावा. जोरजोरात ब्रश केल्याने दातांचे आरोग्य बिघडू शकते. दात घासताना ब्रश हातात धरताना त्याचे ब्रिस्टल हिरड्यांसोबत 45 डिग्रीच्या कोनात राहतील याची काळजी घ्या. तर मागे असलेल्या दातांसाठी ब्रश गोल फिरवावा. ब्रश करताना दातांचा आतील भागही स्वच्छ करा.
टूथपेस्टही शक्यतो सफेद किंवा फ्लोराईडयुक्त असावी जेणेकरुन दातांना कीड लागण्याची शक्यता कमी होते. पण जर घरात सहा वर्षांखालील मुले असतील तर फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट टाळावी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)