मुंबई : अनेकदा वाफाळती चहा, कॉफी पटकन तोंडाला लावली तर जीभ भाजते. गरम पदार्थांचा जीभेला चटका बसला की सहाजिकच पुढील अनेक दिवस कोणताही पदार्थ खाल्ला तरीही त्याची कोणतीच चव लागत नाही.
जीभ भाजल्यानंतर पुन्हा चविष्ट पदार्थांचा आनंद घेण्याचं सुख अनुभवयाचं असेल तर हे काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.
#1 जीभ भाजल्यानंतर नाकाऐवजी थेट तोंडाने श्वास घ्या. याकरिता जीभ थोडी बाहेर काढा म्हणजे थंड हवेमुळे जीभेला झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते. मेन्थॉल च्युईंगममुळेही हा त्रास कमी होण्यास मदत होते.
#2 बर्फाचा गोळा काहीवेळ तोंडात ठेवा. यामुळेही जीभेला होणारा त्रास आटोक्यात ठेवता येऊ शकतो. बर्फ नसल्यास गार पाण्याने गुळण्या कराव्यात.
#3 थंडगार दूध, दहीचे सेवन केल्यानेही जीभेला आराम मिळण्यास मदत होते.
#4 भाजलेल्या जीभेवर तुम्ही साखरेचे दाणे किंवा मध लावल्यानेही फायदा मिळू शकतो. मधामध्ये दाहशामक गुणधर्म असतात.
#5 भाजलेल्या जीभेवर व्हिटॅमिन ई तेल लावावे. बाजारात व्हिटॅमिन ई च्या कॅप्सुल मिळतात. तुम्ही या कॅपसुल्स उघडून त्यामधील जेल जीभेवर लावल्यास जखम कमी होण्यास मदत होते.
#6 भाजलेल्या जीभेवर कोरफडीचा गर लावल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. बर्फासोबतची कोरफडीचा गर चोखू शकता. कोरफडीचा गर थोडा कडवट असू शकतो पण यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते.
#7 जीभ भाजल्यानंतर सायट्र्स फळं किंवा खूप प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे भाजलेली जीभ अजूनच त्रासदायक ठरू शकते.