मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र कोरोनाच्या नव्या विविध वेरिएंटने मात्र चिंता वाढवली आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसनंतर आता कप्पा नवा वेरिएंट समोर आला आहे. राजस्थानमध्ये या वेरिएंटचे आतापर्यंत 11 रूग्ण समोर आले आहेत. तर हा कप्पा व्हेरिएंट नेमका काय आहे? आणि तो किती धोकादायक आहे हे जाणून घेऊया.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, कप्पा व्हेरिएंट हा कोरोना व्हायरसच्या त्या दोन व्हेरिएंट्सपैकी एक आहे जो सगळ्यात पहिल्यांदा भारतात आयडेंटीफाय झाला. कप्पा व्हेरिएंटपूर्वी डेल्टा व्हेरिएंटने भारतात अनेकांचा जीव घेतला आहे. कप्पा आणि डेल्टा हे दोन्ही व्हायरस B.1.617 शी संबंधीत आहेत.
दरम्यान जेव्हा भारतात दुसर्या लाटेला वेग आला होता. तेव्हा कोरोना विषाणूचा B.1.617.2 म्यूटेंट 'भारतीय व्हेरिएंट' म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र यावर भारताने आक्षेप घेतला होता. यानंतर जागतिक आरोग्य संस्थेने याचं नाव बदललं आणि ग्रीक अल्फाबेटप्रमाणे ठेवण्यात आलं. यानुसार B.1.617.2 ला ‘डेल्टा’ आणि B.1.617.1 ला ‘कप्पा’ व्हेरिएंट म्हणलं गेलं.
कप्पा व्हेरिएंट सध्या WHOच्या ‘वैरिएंट ऑफ इंटरेस्ट’या यादीमध्ये आहे. याचा अर्थ या वायरसवर नजर ठेवली आहे हा अजून चिंतेचा विषय नाही. ज्यावेळी याच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल त्यावेळी या व्हेरिएंटला ‘वैरिएंट ऑफ कंसर्न’ या कॅटेगिरीमध्ये समाविष्ट केलं जाईल. जसं डेल्टा व्हेरिएंटतच्या केसमध्ये करण्यात आलं होतं.
WHOच्या अनुसार, कप्पा व्हेरिएंटच्या प्रकारातील विषाणू COVID-19 रोगाचा प्रसार वाढवू शकतात आणि लक्षणांची तीव्रता वाढवू शकतात. इतकेच नाही तर ते शरीरात तयार केलेली प्रतिकारशक्तीवरही परिणाम करू शकतात.
कप्पा व्हेरियंटची लक्षणं देखील इतर कोरोना व्हेरियंट्समुळे होणाऱ्या संसर्गासारखीच आहेत. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, कोरडे तोंड, चव न येणं आणि गंध न येणे ही लक्षणे या व्हेरिएंटमध्ये दिसून येतात. तर या व्यतिरिक्त अजून काही वेगळी लक्षणे देखील उद्भवण्याची शक्यता आहे.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या सांगण्यानुसार, भारतात तयार करण्यात आलेली कोविड लस - कोवॅक्सिन ही कोरोना विषाणूच्या बीटा आणि डेल्टा व्हेरिएंट्स शिवाय कप्प्या व्हेरिएंट या प्रकारातही प्रभावी ठरते. गेल्या महिन्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मेडिकल जर्नल 'सेल' मध्ये कप्पाच्या प्रकारावरील लसीच्या प्रभावाचा उल्लेख केला होता. या अभ्यासानुसार, एस्ट्राजेनेकाची लस कोरोनाच्या डेल्टा आणि कप्पाच्या व्हेरिएंटवर प्रभावी आहे. एस्ट्राजेनेकाची लस कोविशील्ड नावाने भारतात उपलब्ध आहे.