Cervical Cancer: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी नव्या संसदेमध्ये देशाचा 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या (Loksabha Elections 2024) धर्तीवर सादर झालेला हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यामध्ये फार मोठ्या घोषणा अर्थ मंत्र्यांनी केल्या नसल्या तरीही अर्थमंत्र्यानी सर्व्हाकल कॅन्सरसंदर्भात मोठं विधान केलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अंतरिम बजेट 2024 चा भाग म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती दिली. ही लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आहे.
मुंबईच्या सायन रूग्णालयातील स्त्रिरोग विभागाचे डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितलं की, "देशात सर्व्हाकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे रूग्ण आणि मृत्यूंची संख्या अधिक आहे. सरकारने बजेटमध्ये याचा विचार केला या गोष्टीचा आनंद आहे. सरकारच्या या निर्णयाने कर्करोगाला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. ही लस 9-45 वयोगटातील महिलांना देण्यात येते. यामध्ये या लसीचे २ ते ३ डोस देण्यात येतात. याशिवाय सरकारने या लसीकरण मोहिमेला युनिवर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामध्ये आणावं, जेणेकरून त्याचा अधिक फायदा होईल. भारत नाही मात्र ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये ही लस लहान मुलांना देखील देण्यात येते."
भारतात सर्व्हायकल कॅन्सरच्या रूग्णांची संख्या कमी नाही. गर्भाशय मुखाच्या कॅन्सर सर्वाधिक रुग्ण आढळणारा भारत हा पाचवा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख रुग्णांची नोंद होताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 75 हजार महिलांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे.‘एचपीव्ही’ उपप्रकाराच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका अधिक आहे.
HPV लस सामान्यतः कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी वापरली जाते. ही लस दिल्याने HPV मुळे होणाऱ्या योनी, लिंग किंवा गुदद्वाराच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळतं. ही लस जननेंद्रियातील चामखीळ किंवा गुठळ्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते.