मुंबई : तुमच्या दातावर पिवळा किंवा दातांच्या मागच्या बाजूला पिवळा प्लाक दिसतोय का? सकाळी उठल्यानंतर आपण दात घासतो आणि नंतर दिवसभर अन्न खातो. अशा स्थितीत अन्नाचे अत्यंत लहान कण दातांमध्ये साचून बॅक्टेरिया तयार होतात. हे बॅक्टेरिया प्लाक असा जाड चिकट पदार्थ मागे सोडतात. दातांमध्ये साचलेलं हे प्लाक दातांच्या टिश्यूंना कमकुवत करतात. प्लाकमुळे तोंडाच्या अनेक समस्यांना उद्भवतात.
दातांवरील प्लाक कशा पद्धतीने काढू शकता. यासाठी काही घरगुती उपायांचा तुम्ही वापर करू शकता.
दातांमध्ये जमा झालेला प्लाक काढण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा मीठ घ्या. यामध्ये मोहरीच्या तेलाचे 8-10 थेंब टाकून पेस्ट तयार करा. आता या पेस्टने दात घासून घ्या. 3 दिवस अशा पद्धतीने केल्याने तुमच्या दातावरील प्लाक कमी होण्यास सुरुवात होईल.
दातांना दररोज घासणं ही एक महत्वाची सवय आहे. प्रत्येकाने दिवसातून दोनवेळा दात घासले पाहिजेत. दात घासताना इंडियन डेंटल असोसिएशनने मान्यता असलेला टूथब्रश वापरा. ज्यावेळी तुम्ही काही खात असाल त्यावेळी खाल्ल्यानंतर चूळ भरा. तसंच फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरा. फ्लोराईड तुमच्या दातांचं इनॅमल मजबूत करतं.
जेवल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर लगेच दात घासल्याने दात निरोगी राहतात, असं अनेकांना वाटतं. मात्र हा चुकीचा समज आहे. खाल्ल्यानंतर 30-40 मिनिटांनी दात स्वच्छ करावेत. खाल्ल्यानंतर लगेच दात स्वच्छ केल्याने दात कमकुवत होऊ शकतात.
दात घासल्याने केवळ त्याचठिकाणचे कण निघून जातात, जिथे ब्रश पोहोचू शकतो. मात्र दातांच्या मध्ये अडकलेले कण दात घासून निघत नाही. अशावेळी फ्लॉस करणं गरजेचं असतं.