मुंबई : कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन होणं म्हणजे व्यसनच, मग ती गोष्ट चांगली असो किंवा शरीरासाठी धोकादायक. जसं जास्त जेवल्यानंतर पोटाचे विकार होतात किंवा तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीराला अपाय होऊ शकतो तसंच मद्यपान आणि धूम्रपान या दोन व्यसनांनी तर खूप भयानक परिणाम आपल्या शरीरावर होतात.
अनेकजण ही व्यसन सोडण्याचा प्रयत्न करतात मात्र काही केल्या हे व्यसन सुटत नाही. जर तुम्ही हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके गोष्ट सांगणार आहोत. एका संशोधनातून ही हटके गोष्ट सिद्ध झाली आहे ती गोष्ट म्हणजे- रोजच्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या सेवनाने देखील सिगारेट सुटू शकतं.
जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही सिगारेटसारखं व्यसन सोडवू शकता.
सिगारेटमुळे शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’वर परिणाम होतो. याची भरपाई निकोटिन करतं. अशा वेळी जर सिगारेटपासून लवकर सुटका मिळवायची असेल तर मोसंबीचा रस किंवा रसाळ फळांचं जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे. यामध्ये लिंबू, डाळिंब मदत करू शकतात.
सिगारेटच्या सवयीवर शुगर फ्री च्युइंगम एक चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारात असे अनेक च्युइंगम आहेत ज्यामुळे सिगरेटचे व्यसन सुटायला मदत होते. याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला आहे. मात्र याचं मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे.
दुधापासून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वं मिळतात. मात्र तुम्हाला माहितीये का दूध देखील धुम्रपानाच्या सवयीला सोडण्यात मदत करतं. ड्युक्स विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार सिगारेट ओढण्यापूर्वी एक ग्लास दूध घेतलं तर आपल्याला सिगारेट घेण्याचा आनंद येणार नाही. कारण याचा धूर कडू लागू लागतो.