कापूर कोरोनावर उपायकारक? जाणून घ्या काय आहे सत्य

कोरोनावर अद्याप कोणतंही औषधं तयार करण्यात आलं नाही.

Updated: Mar 19, 2020, 07:32 PM IST
कापूर कोरोनावर उपायकारक? जाणून घ्या काय आहे सत्य title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं जगभरात थैमान सुरु असताना, अनेकांकडून यावरील उपाय सांगितले जात आहेत. कोरोनावर अद्याप कोणतंही औषधं तयार करण्यात आलं नाही. मात्र, त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाय सांगितले जात आहेत. सोशल मीडियावरही याबाबतचे उपाय सांगण्यात येत आहेत. मात्र हे उपाय कितपत योग्य, खरे आहेत, याबाबत मोठी साशंकता आहे. सोशल मीडियावर कोणतीही शाहानिशा न करता फॉर्वर्ड केलेले मेसेज लोकांपर्यंत पोहचत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, कोरोना व्हायरस घालवण्यासाठी कापूर फायदेशीर असल्याचा मेसेज... होळीच्या सणापासूनच हा मेसेज व्हायरल होतोय. परंतु आतापर्यंत कापूरबाबत कोणताही दावा करण्यात आलेला नाही. 

काय आहे डॉक्टरांचं म्हणणं? -

राममनोहर लोहियामध्ये इंटरनल मेडिसीनचे माजी प्रमुख डॉ. मोहसिन वली यांची दिलेल्या माहितीनुसार, कापूर किंवा कापराची वडी कित्येक वर्षांपासून हवा स्वच्छ, शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येत आहे. परंतु कापूर कोरोना व्हायरसशी लढू शकत नाही. कोरोना व्हायरस एक संसर्ग आहे, जो केवळ हवेच्या शुद्धीकरणाने मारला जाऊ शकत नाही. कोरोना व्हायरसची लक्षण दिसल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं आणि योग्य ते उपचार करणं हेच अतिशय योग्य पाऊल असल्याचं ते म्हणाले.

मूलचंद रुग्णालयातील कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. केके अग्रवाल यांनी, सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक घरगुती उपाय सोशल मीडियावर पसरत आहेत. परंतु लोकांनी यापासून सतर्क राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. व्हायरसच्या बचावासाठी सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास डॉक्टरांकडून उपचार घेणं योग्य आहे. तसंच लक्षण आढळल्यास स्वत:ला वेगळं ठेवून हा संसर्ग पसरण्यापासून रोखता येऊ शकतं.

लोकांनी कोरोना व्हायरसला न घाबरता योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक खबरदारीच्या उपाययोजना आखत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि सरकारने सांगितलेल्याच उपाययोजना अवलंबण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.