मुंबई: चॉकलेट आणि त्यातही 'डेअरी मिल्क चॉकलेट' हा एक असा पदार्थ आहे, जो खाण्यासाठी सहसा कोण नकार देत नाही. मुळात नकार दिला तरीही त्या नाकारामागे खरंतर होकारच दडलेला असतो. चॉकलेट मुळात आहेच असं. आता तुम्ही म्हणाल की, चॉकलेट नाकारण्यामागचं नेमकं कारण हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असतं. पण, तुलनेने मधुमेह म्हणजेच डायबिटीजमुळे चॉकलेट नाकारणाऱ्यांची संख्या जास्त. अशाच मंडळींसाठी आता एक आनंदाती बातमी आहे.
कारण, 'मॉन्डेलेझ इंटरनॅशनल' या कंपनीतर्फे कमी साखर असणारं 'डेअरी मिल्क चॉकलेट' सादर करण्यात आलं आहे. कंपनीकडून सांगण्यात आल्यानुसार इतर प्रकारच्या 'डेअरी मिल्क चॉकलेट'च्या तुलनेत नव्या उत्पादनात साखरेचं प्रमाण जवळपास ३० टक्के कमी असणार आहे. मुख्य म्हणजे यात गोडवा आणण्यासाठी कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर केला गेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
We are empowering our consumers in #India with choice. Introducing the iconic @DairyMilkIn with 30% Less Sugar! #SnackingMadeRight #CheeniKumCDM #WahiSwaadWahiMithaas pic.twitter.com/uxM9d86w3u
— Mondelēz Intl (@MDLZ) June 10, 2019
इतर सर्वच प्रकारच्या चॉकलेट्सप्रमाणे ही नवी, कमी साखर असणारी डेअरी मिल्कही बाजारत गदी सहजपणे उपलब्ध असणार आहे. 'मॉन्डेलेझ इंडिया'चे अध्यक्ष दीपक अय्यर यांनीही हे नवं उत्पादन भारतीय बाजारपेठेत येत असल्याचा आनंद व्यक केला.
सोशल मीडियावर देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार चॉकलेटमधील अभ्यासकांची एक टीम यासाठी जवळपास २ वर्षांपासून प्रयत्नशील होती. भारत, ब्रिटन आणि विविध उत्पादन केंद्रांवर असणाऱ्या आहारतज्ज्ञांच्या प्रयत्यांचंच हे फळ असल्याचं प्रतीत होत आहे.