Measles Outbreak in Mumbai : लहान मुलांसह प्रौढांनाही गोवरची लागण? 2 संशयित रुग्ण आढळले!

Measles Outbreak in Mumbai : मुंबईच्या (Mumbai) एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोन व्यक्तींची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पालिककडे नोंद करण्यात आलीये.

Updated: Nov 21, 2022, 06:08 PM IST
Measles Outbreak in Mumbai : लहान मुलांसह प्रौढांनाही गोवरची लागण? 2 संशयित रुग्ण आढळले! title=

Measles Outbreak in Mumbai : सध्या राज्यात गोवरची (Measles) अनेक प्रकरणं समोर आलीयेत. अशातच आता गोवरची लागण केवळ लहान मुलांमध्येच नसून प्रौढांमध्येही या संसर्गाची ( Measles infection in adults )  लागण होताना दिसतंय. मुंबईच्या एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोन व्यक्तींची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पालिककडे नोंद करण्यात आलीये. या दोन्ही रुग्णांच्या अंगावर पुरळ उठणं तसंच ताप येण्याच्या तक्रारीमुळे ते खासगी डॉक्टरांकडे गेले होते. 

सध्या या रुग्णांना लक्षणाधारित उपचारासह अ जीवनसत्त्वाची मात्रा देण्यात आली. आता या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गोवराच्या संसर्गाची लागण लहान बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही होतेय का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मोठ्या व्यक्तींना म्हणजेच प्रौढांना गोवर होण्याचं प्रमाण जास्त नाही. मात्र काहींना लहानपणी गोवरची लस घेतल्याचं आठवतंही नाही. पण सध्या गोवरचा एकंदरीत विखळा पाहता मोठ्या व्यक्तींनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोवरचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या जवळ जाऊ नये, असं आवाहन करण्यात महापालिकेकडून आलंय.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषांनुसार, ज्या भागामध्ये गोवरच्या संशयित रुग्णांमध्ये अंगावर पुरळ, ताप अशी लक्षणं दिसून येतात, अशा परिसरातील पाच नमुने वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येतात. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाचपैकी दोन नमुन्यांमध्ये गोवर असल्याचे निष्पन्न झाल्यास या परिसरात गोवराचा उद्रेक असल्याचं घोषित केलं जातं.

या परिसरामध्ये गोवराचा प्रादुर्भाव होत असल्याचे निश्चित झाल्यानंतर याठिकाणाचे नमुने पुन्हा वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येत नाहीत. त्यानंतर येणारे सर्व रुग्ण हे गोवरासाठी संशयित असल्याचं मानलं जातं.