Mpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर

मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. संपूर्ण देशभरात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 22, 2024, 08:58 PM IST
Mpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर  title=

मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. मोठ्याबरोबरच लहान मुलांना देखील या आजाराचा धोका वाढला असताना मुंबईत महानगरपालिका हाय अलर्ट मोडवर गेली आहे. संसर्ग संदर्भात मुंबई महापालिका अलर्ट आली खबरदारीचा उपाय म्हणून सेव्हन हिल्स रूग्णालयात 14 रूग्णशय्या असलेला कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. या आजाराचा मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अद्याप एकही रूग्ण नाही. मात्र शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना तयार केल्या आहेत

पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आरोग्य माहिती कक्षासोबत समन्वय साधण्यात येत आहे

 याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित सेव्हन हिल्स रूग्णालयात 14 रूग्णशय्या असलेला कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन करण्यात येत आहे. जगातील काही देशात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाकडूनदेखील ‘मंकीपॉक्स’ सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई महानगरात विदेशातून येणाऱया नागरिकांचे प्रमाण पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मंकीपॉक्स’ आजाराच्या प्रतिबंध आणि उपाययोजनांसाठी तयारी सुरू केली आहे. संसर्गजन्य आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी विशेष रूग्णालये असलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित सेव्हन हिल्स रूग्णालयात संभाव्य ‘मंकीपॉक्स’ रूग्णांसाठी आरक्षित कक्ष  व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षामध्ये चौदा रूग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याचीही रूग्णालय प्रशासनाने तयारी ठेवली आहे. 

जगभरात विविध देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ (Monkeypox) या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे आढळले आहे. परिणामी ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘मंकीपॉक्स’ संसर्गास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता 14 रूग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रसंगी या रूग्णशय्यांची संख्या वाढवण्याची तयारीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने केली आहे.     

परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणासोबत नियमितपणे समन्वय आणि संपर्क साधण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.    

मंकीपॉक्सचा प्रसार कसा होतो? 

- थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्रव

- अप्रत्यक्ष संपर्क, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत

- जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱया मोठ्या थेंबावाटे 

- बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. 

Mpox ची लक्षणे / चिन्हे

- ताप

- लसीका ग्रंथी सूज

- डोकेदुखी, अंगदुखी

- थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला

कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या समुदायांमध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो. 

मंकीपॉक्स सदृश्य इतर आजार

कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलीस, हात, पाय, मौखिक आजार इत्यादी

रूग्णव्यवस्थापन आणि विलगीकरण

- मंकीपॉक्स रूग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक आहे. याठिकाणी स्वतंत्र वायूविजन व्यवस्था असावी

- रूग्णाने तीन स्तर आधारीत मुखपट्टी (मास्क) घालणे गरजेचे आहे

- रूग्णाने पुरळ फोड नीट झाकले जावे, यासाठी लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पँट वापराव्यात

- लक्षणानुसार उपचार घ्यावेत आणि शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे प्रमाण कायम राहील, याची दक्षता घ्यावी.