Mumps Galgund Risk In Mumbai: वर्षभरामध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अगदी डोळे येण्याच्या साथीपासून ते सर्दी खोकला आणि घशातील खवखवीची साथ पसरल्याचं पाहायला मिळालं. मात्र वर्षाच्या शेवटचाकडे जात असतानाच मुंबईकरांनी अधिक सावध होण्याची गरज आहे. कारण मुंबई परिसरामध्ये गालगुंडसारख्या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. तसेच यापैकी काही जणांना बहिरेपणाचा त्रासही होत असल्याची माहिती समोर आली आहे. हा संसर्ग गालगुंड आजाराचा असला तरी तो सामान्य संसर्गाप्रमाणे नसून 'नवीन' पद्धतीचा आहे, ज्याच्या लक्षणांपासून परिणामांपर्यंत बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. सामान्यपणे लहान मुलांमध्ये आढळणारा गालगुंडचा आजार या संसर्गामुळे प्रौढांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या विषाणूमध्ये सातत्याने बदल होत असल्याने म्हणजेच म्युटेशन होत असल्याने या आजाराची लक्षणं आणि परिणाम बदलल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मुंबईकरांना हिवाळ्यामध्ये दरवर्षी संसर्गजन्य आजारांशी 2 हात करावे लागतात. मात्र सामान्यपणे या कालावधीत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गालगुंडासारख्या आजाराचे अगदी 2 ते 3 रुग्णच आढळून येतात. मात्र गेल्या 20 दिवसांमध्ये रोज शहरात गालगुंडचे 7 ते 8 रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. काहीवेळा दिवसाला अगदी 10 रुग्णही गालंगुंड झाल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या रुग्णांना ही गालगुंडची तक्रार आहे त्यामध्ये 35 ते 40 वयोगटातील व्यक्तींचाही समावेश आहे. तसेच सहव्याधी असलेल्यांना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गालगुंड बरे होण्याच्या कालावधीतही वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
संसर्गजन्य आजाराचे विषाणू प्रबळ होण्यासाठी वाढते प्रदूषण कारणीभूत ठरते. त्यामुळे अशा विषाणूंमध्ये सातत्याने म्युटेशन्स होत असतात. गालगुंडच्या विषाणूमध्ये म्युटेशन झाल्याने रुग्णसंख्या वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग झालेल्या काही रुग्णांना कानात शिट्टी वाजविल्याचा भास होऊन ऐकू येणे बंद होते. यापूर्वी एखाद्याच रुग्णाला कानाचा त्रास होत असे. मात्र यावेळी अनेक रुग्णांना कान दुखणे, कमी ऐकू येणे अशा समस्या जाणवत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कानाचा त्रास सुरू झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये योग्य उपचार न केल्यास नस बाधित होऊन कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका उद्भवू शकतो, असं डॉक्टर सांगतात.
नालासोपारा, वसई विरार या भागांतही मुख्य शहराप्रमाणेच गालगुंडचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाकाळात इतर रोगांच्या लसीकरणावर परिणाम झाल्यामुळे अन्य संसर्गजन्य आजार बळावत असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पूर्वी गालगुंड झाल्यानंतर गळयाखाली सूज, ताप यासारखी लक्षणं दिसायची. आता मात्र सर्दी, खोकला झाल्यावर दोन दिवसांनी सूज दिसून येते. आधी गालगुंड झाल्यावर दोन्ही बाजूला एकाच वेळी सूज दिसायची. आता मात्र आधी एका गालावर सूज दिसते आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी दुसऱ्या बाजूला सूज दिसून येते. पूर्वा गालगुंडाचा संसर्ग झाल्यास 5 दिवसात रुग्ण बरा व्हायचा. आता लहान मुलांना गालगुंडावर मात करण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. तर प्रौढांना 7 दिवसांचा कालावधी लागतोय.
– डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या
– गालगुंड झालेल्या जागी हलका मसाज करा
– गालाखाली गरम पाण्याचा शेक द्या
– मधूमेह, रक्तदाब किंवा इतर सहव्याधी असल्यास विशेष काळजी घ्या
– कानात शिट्टीसारखा आवाज येत असल्यास तातडीने डॉक्टरांची भेट घ्या
– गालगुंड हा संसर्गजन्य आजार असल्याने तो झाल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.