जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?

Mysterious Virus Infection in China: डिसेंबर 2019 च्या शेवटी एका नव्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो असा इशारा ज्या संस्थेनं दिला होता तिनेच हा इशारा दिला आहे. 2019 च्या इशाऱ्यानंतर लगेच जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 23, 2023, 11:24 AM IST
जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार? title=
यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनंही इशारा दिला आहे

Mysterious Virus Infection in China: कोरोनाच्या दहशतीनंतर आता साथीचा रोग म्हटलं तरी लोकांची भीतीने गाळण उडते. असं असतानाच आता नव्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे.

लक्षणं काय?

चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता कुठे कोरोनाच्या धक्क्यातून सावरु लागली आहे. असं असतानाच आता कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात होती तशी परिस्थिती निर्माण होणार की काय अशी भीती पुन्हा चिनी लोकांच्या मनात डोकवू लागली आहे. खरं तर चीनमध्ये वेगाने पसरत असलेला हा संसर्ग निमोनियासारखा आहे. मात्र या आजाराची लक्षणं निमोनियासारखी नाहीत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या मुलांच्या फुफ्फुसांना सूज येते. संसर्ग झाल्यानंतर मुलं तापाने फणफणू लागतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

शाळा बंद करण्याची तयारी

निमोनियासारख्या या रहस्यमयी आजाराने ग्रासलेले रुग्ण चीनच्या ईशान्य बिजिंग आणि लियाओनिंगच्या रुग्णालयांमध्ये आहेत. रुग्णांची संख्या एवढी आहे की रुग्णालयातील सेवांवर आतापासूनच तणाव पडू लागला आहे. संसर्गाचं प्रमाण दिवसोंदिवस वाढत असल्याने सरकारने आता थेट शाळा बंद करण्याची तयारी पूर्ण केली असून कोणत्याही क्षणी तशी घोषणा होऊ शकते. या संसर्गासंदर्भात एका ओपन-अॅक्सेस ऑब्झर्व्हर असलेल्या 'प्रोमेड'ने जगभरातील देशांसाठी इशारा जारी केला आहे. जगभरातील प्राणी आणि मानवामध्ये होणाऱ्या विषाणूंच्या संसर्गासंदर्भातील समस्यांवर लक्ष ठेऊन असलेल्या या गटाने हा संसर्ग प्रामुख्याने लहान मुलांना होतो असं म्हटलं आहे.

एवढ्या मोठ्या संख्येनं संसर्ग

'प्रोमेड'ने डिसेंबर 2019 च्या शेवटी एका नव्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो असा इशारा दिला होता. यानंतरच कोरोनाच्या विषाणूचा जगभरामध्ये फैलाव झाला होता. या संस्थेनं जागतिक आरोग्य संघटनेतील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांना इशारा दिला आहे. प्रामुख्याने श्वसनावर परिणाम करणाऱ्या एका अज्ञात आजाराबद्दलचा हा इशारा असल्याचं 'प्रोमेड'ने म्हटलं आहे. मात्र या विषाणूचा संसर्ग कधी पाहून होऊ लागला हे 'प्रोमेड'ने स्पष्ट केलेलं नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या संख्येनं मुलांना संसर्ग होणार नाही असंही 'प्रोमेड'ने म्हटलं आहे. या संसर्गामध्ये मुलांच्या माध्यमातून वयस्कर लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असंही 'प्रोमेड'चं म्हणणं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला हवीय माहिती

जागतिक आरोग्य संघटनेनं या संसर्गासंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर चीनकडे सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबद्दल चीनने 13 नोव्हेंबर 2023 रोजी स्थानिक प्रसारमाध्यमांना कळवलं होतं अशी माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेनं चीनला या संसर्गासंदर्भातील प्रकरणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अधिक माहिती पुरवावी असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.