चीनमध्ये कोरोना वायरस, संपूर्ण जगावर धोक्याचं सावट

चीनमध्ये एकूण ५९ लोकांना या धोकादायक वायरसची लागण झाली आहे.  

Updated: Jan 19, 2020, 12:55 PM IST
चीनमध्ये कोरोना वायरस, संपूर्ण जगावर धोक्याचं सावट

मुंबई : भारत देशासोबत जगातल्या देशांवर एका धोकादायक वायरसचं सावट आहे. ही धोकादयक वायरस चीनमध्ये आढळला आहे. कोरोना वायरस (coronavirus) असे या वायरसचे नाव आहे. चीनमध्ये एकूण ५९ लोकांना या धोकादायक वायरसची लागण झाली आहे. आता हा वायरस संपूर्ण जगात पसरत आहे. मीडिया रिपोर्टनुसार थायलँडमध्ये कोरोनावायरसने एकाचा बळी घेतला आहे. 

जागतिक आरोग्य संस्थने (WHO) भारत देशासोबतच अन्य देशांना देखील सतर्कतेचा इशारा देत हा वायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितले आहे. या वायरसमुळे सामान्य लोकांचा बळी जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

नुकताच चीनच्या प्राधिकरणाने एक अहवाल सादर केला. अहवालात वुहान शहरात एकूण ५९ लोकांना या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. चीनसोबतच आता थायलँड, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे. 

चीनमधील वुहानामध्ये एका संशोधनात नेपाळी विद्यार्थ्याला या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. हा विद्यार्थी ५ जानेवारी रोजी नेपाळमध्ये आला. त्याच्यावर आता काठमांडू येथील  शुक्रराज ट्रॉपिकल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

चीन सरकारने या बातमीला दुजोरा दिल्यानंतर जागतिक आरोग्य संस्थेने संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना वायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.