Omicron नंतर कोरोनाचे अजून व्हेरिएंट्स येणार, तज्ज्ञांचा दावा

तज्ज्ञांनी दावा केला आहे की, ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नाहीये.

Updated: Jan 17, 2022, 09:47 AM IST
Omicron नंतर कोरोनाचे अजून व्हेरिएंट्स येणार, तज्ज्ञांचा दावा title=

अमेरिका : कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्समुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसबाबत रोज नवनवीन अभ्यास समोर येत आहेत. अशातच आता तज्ज्ञांनी दावा केला आहे की, ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नाहीये.

तज्ज्ञांनी सांगितलं की, प्रत्येक संसर्गामध्ये व्हायरस म्युटेशन करण्याची क्षमता असते. ओमायक्रॉन स्वतःमध्ये बदल करून वाढू शकतो. लस आणि प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या सापडली असूनही तो लोकांना संक्रमित करतोय. याचा अर्थ हा व्हायरस अधिकाधिक लोकांमध्ये विकसित होऊ शकतो.

दरम्यान तज्ज्ञांनी असंही स्पष्ट केलंय की, कोरोनाच्या पुढील व्हेरिएंटमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणं दिसून येतील याबद्दल त्यांना माहिती नाही. तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, ओमायक्रॉनचा सिक्वेल हा एक सौम्य आजार असेल मात्र त्यावर लसीकरण काम करेल याची शाश्वती नाही.

वेगाने पसरतोय ओमायक्रॉन व्हेरिएंट

बोस्टन युनिव्हर्सिटीचे एपिडेमियोलॉजिस्ट लिओनार्डो मार्टिनस यांनी सांगितलं की, वेगाने पसरत असल्याने ओमायक्रॉनला अजून म्युटेशन करण्याची संधी मिळेल. परिणामी याचे अजून व्हेरिएंट समोर येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या मध्यात हा व्हेरिएंट आला असून तो जगभर पसरला आहे. संशोधनात असं दिसून आलं की, डेल्टा प्रकाराच्या तुलनेत ओमायक्रॉनचा वेग चार पटीने अधिक होतो.

लिओनार्डो मार्टिनस यांनी पुढे सांगितलं की, ओमायक्रॉनमुळे देखील ब्रेकथ्रू संसर्ग झाला आहे. यामुळे लस घेतलेल्या लोकांनाही याचा संसर्ग होतोय. याशिवाय लसीकरण न झालेल्यांनाही याची लागण होताना दिसतेय.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. स्टुअर्ट कॅम्पबेल म्हणाले की, वारंवार आणि दीर्घकाळ संसर्ग झाल्यामुळे नवीन व्हेरिएंट येण्याची दाट शक्यता आहे.