मुंबई : प्रत्येक व्यक्तीला झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. यापैकी काही स्वप्न चांगली असतात तर काही स्वप्न ही फार भितीदायक असतात. रात्री पाहिलेली स्वप्न अनेकदा आपल्या सकाळी लक्षात राहत नाहीत. कदाचित तुमच्यासोबत देखील असं घडत असेल. अशावेळी आपल्या मनात एक प्रश्न असा येतो की आपल्याला ही स्वप्न का आठवत नाहीत. तर आजच्या या आर्टिकलमधून जाणून घेऊया की आपल्याला स्वप्न का पडतात आणि आपण ती का विसरतो.
आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. ज्यामध्ये रॅपिड आय मूव्हमेंट एक असतो. या टप्प्यामध्ये व्यक्ती फार गाढ झोपेत असतो. आणि याच कालावधीत स्वप्न पाहण्याची शक्यता अधिक असते. स्वप्नांच्या संबंधात अनेक वैज्ञानिक थियरी आहेत.
एका थियरीच्या माध्यमातून, झोपेत असताना देखील आपलं डोकं सक्रिय असतं. मात्र त्यावेळी त्याच्या लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्न आपल्याला पडतात.
जेव्हा आपण स्वप्न बघत असतो त्यावेळी लक्षात ठेवणारं ब्रेन केमिकल नॉरपेनेफ्रिन आणि ब्रेन इलेक्ट्रिक अॅक्टीव्हीटी सर्वात कमी स्तरावर सक्रिय असतात. त्यामुळे स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता फार कमी असते. एका थिअरीनुसार, जे स्वप्न बघून आपण त्वरित झोपेतून उठतो ती स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते.
स्वप्न लक्षात ठेवण्यासाठी झोपताना या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला रात्री पडणारं स्वप्न लक्षात ठेवायचं आहे. जर झोपण्यापूर्वी तुमचा असा विचार असेल तर सकाळी उठल्यावर स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बेडवरून न उठता स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करा.