कॅन्सरवरील लस (Cancer Vaccine) शोधण्यासाठी सध्या सर्वच देश प्रयत्न करत आहेत. जगभरात अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कॅन्सरला कशाप्रकारे रोखता येईल यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र संशोधन करत आहेत. यादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी त्याचे वैज्ञानिक करोनावरील लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले असून, लवकरच ती रुग्णांसाठी उपलब्ध होईल असा दावा केला आहे. पुतिन यांनी टीव्हीवर बोलताना सांगितलं आहे की, "आम्ही तथाकथित कर्करोगाच्या लसी आणि नवीन पिढीच्या इम्युनोमोड्युलेटरी औषधांच्या निर्मितीच्या अगदी जवळ आलो आहोत".
इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे एक गोष्ट जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला कर्करोग, संसर्ग किंवा इतर रोगांशी लढण्यास मदत करू शकते. पुतिन यांनी मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीच्या मंचावरुन संबोधित करताना सांगितलं की, "लवकरच ही लस वैयक्तिर उपचार पद्धती म्हणून प्रभावीपणे वापरली जाईल अशी आशा आहे". पण पुतिन यांनी यावेळी ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल किंवा कशाप्रकारे करेल याबद्दल सविस्तर माहिती दिलेली नाही.
कर्करोगावरील लसीसाठी अनेक देश आणि कंपन्या अहोरात्र संशोधन करत आहेत. गतवर्षी युके सरकारने जर्मनीमधील BioNTech कंपनीशी करार केला होता. रुग्णांना वैयक्तिक कॅन्सर उपचार देण्यासाठी क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. 2030 पर्यंत 10 हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य यावेळी ठेवण्यात आलं होतं.
फार्मास्युटिकल कंपन्या Moderna आणि Merck & Co प्रायोगिक कर्करोगाची लस विकसित करत आहेत. या लसीच्या अभ्यासातून समोर आलं आहे त्यानुसार, सर्वात प्राणघातक त्वचेचा कर्करोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलेनोमामध्ये तीन वर्षांच्या उपचारानंतर पुनरावृत्ती किंवा मृत्यूची शक्यता कमी होते.
जागतिक आरोग्य संघटनेकडील उपलब्ध माहितीनुसार, ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) विरूद्ध सध्या सहा लसी उपलब्ध आहेत, ज्यांना परवाना देण्यात आला आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह अनेक कर्करोगांसाठी कारणीभूत असतो. तसंच यकृताच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या हिपॅटायटीस बी (HBV) विरुद्धही लस आहे.
करोना व्हायरसदम्यान रशियाने स्पुतनिक व्ही लस विकसित केली होती. अनेक देशांना त्यांनी ही लस विकली होती. पण देशात मात्र अनेक नागरिक लस घेण्यास इच्छुक नव्हते. पुतिन यांनी लसीचा प्रभाव आणि सुरक्षा दाखवण्यासाठी स्वत: ही लस घेतली होती.