प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचं सांगितलं जातंय. अशात अनेक पालक मुलांना घराबाहेर पाठवत नाहीत. मुलं घरात कंटाळू नये यासाठी पालक त्याच्या हातात थेट मोबाईल देऊन टाकतात. यामुळे घरात बसलेल्या मुलांना अतिमोबाईलच्या वापराची सवय लागली आहे. मात्र पालकांनो तुम्हाला माहिती आहे का जास्त स्क्रिन टाईममुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमी होतेय...पहा काय आहे लहान मुलांमध्ये मोबाईल आणि कोरोनाचा संबंध.
मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलांचं हृदय, किडन्या, मेंदू तसंच पचन शक्तीवर परिणाम होतो. मुलं एकाच ठिकाणी बसून मोबाईल पाहतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल कमी होते. त्यातून लठ्ठपणा वाढतो, पचनशक्ती कमकुवत होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
यासंदर्भात माहिती देताना बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे म्हणाले, "स्थूलता वाढणं, वजन वाढू लागणं, मेदयुक्त पदार्थ त्यावेळी खावेसे वाटणं याचमध्ये स्क्रिन बराच वेळ पाहणं, डोकेदुखी या सर्वांमुळे प्रतिकारशक्तीचा ऱ्हास होतोय. त्यामुळे मुलांच्या स्क्रिन टाईमकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे."
डॉ. दरवडे पुढे म्हणाले, "मुलांना टाईमपास म्हणून मोबाईल देण्यात येतो त्या मोबाईलच्या आहारी मुलांना न जाऊ देता पालकांनी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. मुलांसोबत पालकांनी खेळणं पाहिजे यामुळे लहान मुलं स्क्रिन टाईमपासून वाचू शकतील."
मुलांचा आहार व्यवस्थित ठेवा
विविध जीवनसत्व असलेले पदार्थ खायला द्या
जंक फूड टाळा
मुलांबरोबर वेळ घालवा, त्यांच्यासोबत खेळा
रोगप्रतिकारक शक्ती बाजारातून विकत घेता येत नाही, ती मुलांमध्ये निर्माण व्हावी लागते. त्यामुळे मुलांच्या हाती जास्त मोबाईल नको. त्यापेक्षा मुलं तंदुरुस्त कशी राहतील, याकडे पालकांनी लक्ष द्यावं.