पृथ्वीवरुन गायब झालेली सरस्वती नदी पुन्हा अवतरली? भारतात जमीन फाटून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला

Saraswati River : पृथ्वीवरुन लुप्त झालेली सरस्वती नदी पुन्हा अवतरली आहे.  वाळवंटात जमिनीतून पाण्याचे फवारे बाहेर आले. लुप्त झालेल्या सरस्वतीच्या उगमाची चर्चा सुरु झाली. 

वनिता कांबळे | Updated: Dec 31, 2024, 03:20 PM IST
पृथ्वीवरुन गायब झालेली सरस्वती नदी पुन्हा अवतरली? भारतात जमीन फाटून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला title=

Lost Saraswati River suddenly resurfaces in Rajasthan :  पुराणात सरस्वती नदीबाबत अनेक उल्लेख आढळतात. सरस्वती नदीबाबत अनेक दंतकथा आहेत. पण या सरस्वती नदीचं अस्तित्व कुठंही दिसत नाही. सरस्वती नदी राजस्थानात लुप्त पावल्याचा दावा केला जातोय. गायब झालेली हीच सरस्वती नदी पुन्हा अवतरल्याचा दावा करण्यात आलाय. 

राजस्थानातील जैसलमेरच्या वाळवंटात जमिनीतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला. जमीन फाटून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला होता. काही क्षणात या परिसराला तळ्याचं स्वरुप आलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रवाह एवढा मोठा होता की त्या प्रवाहात बोअरिंग मारणारा ट्रकही बुडाला होता. वाळवंटात थेंबभर पाण्यासाठी वणवण करावी लागले. पण जैसलमेरच्या वाळवंटाला पाण्यामुळं नदीचं स्वरुप आलं. शनिवारी संध्याकाळी तिथं बोरिंग मारण्याचं काम सुरु होतं. जवळपास साडेआठशे मीटर बोरिंग मारल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह सुरु झाल्याचं सांगण्यात येतंय.

वाळवंटात जमिनीतून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडणं ही बाब सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होती. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली. जमिनीतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडत होता. हा प्रवाह थांबवण्यासाठी ओएनजीसीची टीमही घटनास्थळी दाखल झाली. पण पाण्याचा एवढा मोठा प्रवाह पाहून त्यांचंही डोकं चालत नव्हतं. पाण्याच्या प्रवाहापुढं सगळेच जण हतबल दिसत होते.

ज्या ठिकाणी पाणी जमिनीतून बाहेर येत होतं तिथल्या पाचशे मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. शनिवारी सुरु झालेला पाण्याचा प्रवाह तिसऱ्या दिवशी आपोआप बंद झाला. प्रशासनही या गोष्टीला चमत्कार म्हणू लागलंय. जिथं माणसाची बुद्धी चालत नाही त्या गोष्टीला माणूस चमत्कार मानू लागतो. त्याच चमत्काराला नमस्कार घातला जातो. जैसलमेरच्या वाळवंटातून बाहेर आलेल्या पाण्याच्या प्रवाहासोबतही एक कथा जोडली जाऊ लागलीये. ही दंतकथा आहे लुप्तच झालेल्या सरस्वती नदीची.

सरस्वती नदीच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक अंगानं कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.. मात्र जैसलमेरच्या वाळवंटात आलेल्या जलप्रवाह पाहून लोकांच्या धार्मिक जाणिवा जागृत झाल्यात. सध्या तिथं जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आलीये. पण येत्या काळात सरस्वतीचं उगमस्थान म्हणून तिथं मंदिर उभारलं गेल्यास आश्चर्य वाटू नये.

काय आहे सरस्वतीची दंतकथा?

पुराणात गंगा, यमुना, सरस्वती नदीचा उल्लेख होतो
गंगा आणि यमुना नद्या अस्तित्वात आहेत
सरस्वती नदीचा कुठंही अस्तित्व सापडत नाही
सरस्वती नदीचा उगम उत्तरांचलच्या रुपण ग्लेशिअरमध्ये होत होता
तिथून ही नदी हरियाणा राजस्थानातून वाहत होती
कालांतरानं झालेल्या भूगर्भीय बदलांमुळं नदी राजस्थानात लुप्त झाल्याची कथा आहे.
जैसलमेरचे स्थानिक लोकंही सरस्वती अवतरल्याचं सांगू लागलेत.