लहान मुलांच्या दातांची अशी घ्या काळजी...

आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे गरजेचे

Updated: Aug 10, 2020, 12:12 PM IST
लहान मुलांच्या दातांची अशी घ्या काळजी... title=

मुंबई : बाळाचा पहिला दात येणापुर्वीच त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर एखाद्या स्वच्छ कापडाने त्याच्या हिरड्या पुसुन घ्याव्यात. हिरड्यांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते.

दुधाचे दात हिरड्यांमधून बाहेर येण्याची प्रक्रिया सहा महिन्यांनंतर सुरू होते. सुरूवातीला सुळे दात (२), दाढा (२) व चार दात येतात. त्यानंतर प्रत्येक सहा महिन्याला चार दात येतात अशी माहिती खारघरच्या मदरहुड हॉस्पीटलचे नवजात शिशु तज्ञ नव बालरोग तज्ञ डॉ. मुब्बाशीर खान यांनी सांगितली.

दुधाचे दात हे फक्त खाण्यासाठी व चावण्यासाठीच नव्हे तर बोलण्यासाठी व शब्द उच्चारणासाठीसुद्धा मदत करतात. अगदी लहान बाळाला दात नसताना, दूध पाजल्यावर बाळाच्या हिरड्या स्वच्छ ओल्या कपड्याने साफ केल्या पाहिजेत तरच हिरड्या स्वच्छ राखण्यात मदत होईल. दात येताना बाळाला जुलाब होतातच किंवा दूध पचत नसल्याने असं होतं ही गैरसमजूत आहे.

बाळाच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट तोंडात टाकण्याकडे त्यांचा कल असतो. खेळणी, हातापायाची बोटं तोंडात घातली जातात. यामुळे जुलाबाचा त्रास होत असतो. तो पालकांनी लक्षात घेतला पाहिजे. लहान बाळांना दूध, फळाचा रस किंवा इतर काही गोड द्रव्य पदार्थ पाजण्यासाठी आपण बाटली वापरतो.

रात्रीच्या वेळी अनेक पालक आपल्या बाळांना बाटलीत दूध किंवा ज्यूस घालून पाजतात व मुलं ती बाटली तोंडातच ठेवून झोपी जातात. असे केल्यास ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात.

तोंडातील जिवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात. हा प्रकार रोज घडल्याने दुधाचे दात पूर्णपणे नष्ट होतात.

-    स्वच्छ कपड्याने बाळाच्या हिरड्या पुसुन घेणे गरजेचे आहे जेणेकरून येणारे दात किडणार नाही.

-    आपल्या घरातील लहान मुलांसमोर दात घासावेत जेणेकरून त्यांनाही दात घासण्याची आवड निर्माण होईल. लहान मुलांना दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावावी. वेळोवेळी दंतचिकित्सकांकडे भेट द्या आणि दातांची तपासणी करा

-    ब-याच मुलांना ब्रश करणे कंटाळवाणे वाटते. अशावेळी काही गोष्टींचा वापर करून याला मजेशीर कसे करता येईल याकडे भर द्यावा. मुलांचे दुधाचे दात व हिरड्या निरोगी असल्या तर आणि तरच त्याचे येणारे नवीन प्रौढ दातसुद्धा निरोगी राहतात.

-    रात्रभर दुधाची बाटली तोंडात ठेवून झोपल्याणेही हिरड्यांना हानी पोहोचू शकते आणि यामुळे हिरड्यांना हानी पोहोचू शकते.

-    दिवसातून दोन वेळा दात घासण्याची सवय लावावी. असे केल्याने दातांच्या समस्यांपासून दूर राहणे शक्य होते.

-    जेव्हा बाळ दुधाव्यतिरिक्त आहार घेण्यास सुरुवात करते त्यावेळी त्याच्या हिरड्यांची तसेच दातांची विशेष काळजी घ्यावी. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच वेळोवळी दंत तपासणी करून घ्यावी.