दिल्ली : ओमायक्रॉनने जगाच्या चिंतेत भर पाडली आहे. देशातही ओमायक्रॉनचे रूग्ण सापडत असून याला प्रतिबंध म्हणून कोरोना लसीचा बूस्टर डोस देणार का यावर प्रश्न उपस्थित होतायत. दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितलं की, वैज्ञानिक समुदाय अँटी-कोविड -19 लसीचे बूस्टर डोस देण्याच्या सर्व पैलूंचा विचार करतंय, तर जास्तीत जास्त संभाव्य लोकसंख्येचे प्राथमिक लसीकरण हे सर्वात महत्त्वाचं लक्ष्य आहे.
NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "लस संसाधनांच्या बाबतीत सध्याची परिस्थिती एकंदरीत चांगली आहे. वैज्ञानिक समुदाय या पैलूंचा सतत विचार करत आहे."
पॉल म्हणाले, "संसाधनांची कमतरता नसताना, महामारीविज्ञान आणि वैज्ञानिक सल्लामसलत यांच्या आधारावर लसीच्या बूस्टर डोसबद्दल निर्णय घेतला जाईल."
पॉल यांनी सांगितलं की, शास्त्रज्ञांची एक सक्षम टीम बूस्टर डोसच्या समस्येची चौकशी करेल. यावर अजून काम सुरु आहे. हा पर्याय योग्य पुराव्यानिशी आणि योग्य वेळी घेतला जाईल.
"पण वस्तुस्थिती अशी आहे की हा सर्व दृष्टीकोन तेव्हा येतो जेव्हा आम्ही जास्तीत जास्त संभाव्य लोकसंख्येला प्राथमिक लसीकरण कव्हरेज प्रदान केलं. ते सर्वात महत्वाचं लक्ष्य आहे," पॉल म्हणाले.