अमेरिका : आईचं दूध हे बाळासाठी उत्तम मानलं जातं. अनेक नवजात बालकांना आईचं दूध मिळत नाही. अशावेळी काही महिला पुढाकार घेऊन स्वतःचं दूध दान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतात. मात्र तुम्ही कधी आईच्या दूधाच्या विक्रीबाबत ऐकलंय का? अमेरिकेतील एक महिला स्वतःचे दूध (Breast Milk) विकून मदत करते.
अमेरिकेमध्ये सध्या बेबी फॉर्म्युला किंवा बेबी मिल्क पावडरच्या टंचाईला सामोरं जावं लागतंय. यासाठी तिथल्या पालकांना त्यांच्या बालकांची पोटं भरण्यासाठी मोठ्या अडचणी येतायत. या कठीण काळात एका आईने मोठा निर्णय घेत ब्रेस्ट मिल्क विकून अशा पालकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
एलिसा असं या महिलेचं नाव असून तिने सांगितलं की, बेबी फॉर्म्युला उपलब्ध नसल्याने पालकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्यानंतर मी हा निर्णय घेतला. माझ्या घरात 118 लिटर आईचे दूधाची साठवण आहे. माझ्या घरी तीनपेक्षा जास्त रेफ्रिजरेटर्स असून मी ब्रेस्ट मिल्क साठवू शकते.
एलिसाच्या मुलीला SMA (स्पाइनल मस्कुलर एट्रोफी) आहे. तिला रक्त तपासणी आणि इतर आवश्यक औपचारिकता करणं कठीण जातं, असं एलिसाने सांगितलंय.
ब्रेस्ट मिल्क ऑनलाइन विकणं अधिक सोयीचं ठरू शकतं असं एलिसाला वाटलं. ती म्हणते, या दुधाची किंमत $1 प्रति औंस दर आहे. पण संघर्ष करणाऱ्या मातांसाठी किंमत कमी-जास्त करण्यासही मी तयार आहे.