मुंबई : अनेकांना जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर गोड खाण्याची तीव्र इच्छा असते. तुम्हांलाही ही सवय असल्यास काही चूकीचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. जेवणानंतर तुम्ही मिठाईतील एखादा पदार्थ खात असल्यास शरीरात अधिक कॅलरीज जाण्याची शक्यता असते. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू शकते.
बाजारात मिळणार्या अनेक रसदार बेरीजमध्ये अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. बेरीक खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सी आणि फ्लॅवोनाईड्सचं प्रमाण वाढतं.
डार्क चॉकलेट खाण्याची सवय असणार्यांमध्ये हृद्य मजबूत राहण्यास त्याची मदत होते. एका डार्क चॉकलेटच्या तुकड्यामध्ये सुमारे 70% कॅलरीज असतात. त्यामुळे जेवणानंतर प्रमाणातच डार्क चॉकलेटचा आहारात समावेश करावा.
खजूरामध्येही ग्लुकोज, मिनरल, अमिनो अॅसिड, सुक्रोज, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात असतात. खजूरही प्रमाणातच आहारात घ्यावा. एका खजूरामध्ये सुमारे 23 कॅलरीज असतात. नियमित 3-4 खजूर खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामधून 70-100 कॅलरीज मिळतात.
गूळामध्ये आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे नैसर्गिकरित्या हिमोग्लोबीन वाढायला मदत होते. मात्र तुम्ही मधुमेही असाल, रक्तात साखरेची पातळी अधिक असल्यास त्याचा आहारातील समावेश टाळा. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये असल्यासच थोड्या प्रमाणात गूळ खाणं हितकारी आहे.