इटली : पश्चिमात्य देशांमध्ये अनेकजण एकटे राहतात. इतकंच नव्हे तर लोकांना आजूबाजूला काय होतंय याचीही अनेकदा महिती नसते. असंच एक प्रकरण इटलीमधून समोर आलं आहे. या ठिकाणी एका 70 वर्षीय महिलेचा मृतदेह तब्ब्ल 2 वर्षांनी तिच्या घरात असल्याची माहिती मिळाली
मुख्य म्हणजे, ही महिला तिच्या घरात एकटीच राहत होती. त्यामुळे तिचा मृत्यू केव्हा झाला हे कोणालाही कळलं नाही. झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी महिलेच्या घरी पोहोचले असता तिचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, मारिनेला बेरेटा नावाची महिला उत्तर इटलीतील लोम्बार्डीकडे लेक कोमोजवळ राहात होती. कोमो सिटी हॉलचे प्रेस अधिकारी फ्रान्सिस्का मॅनफ्रेडी यांनी सांगितलं की, ज्यावेळी महिलेचा महिलेचा मृतदेह सापडला त्यावेळी तो कुजलेला होता. ती खुर्चीवर बसली होती आणि बसताना तिचा जीव गेला असावा. शुक्रवारी झाड पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी मरिनेला बेरेटाचा मृतदेह बाहेर काढला.
मॅनफ्रेडी पुढे म्हणाले की, महिलेच्या मृत्यूचं कारण अजून समजू शकलेलं नाही. मृतदेहाच्या तपासणीनंतर, 2019 च्या अखेरीस मरिनेला बेरेटाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
बेरेटाचे कोणतेही नातेवाईक अद्याप पुढे आलेले नाहीत. या महिलेचं कोणी कुटुंब आहे का, याचा तपास पोलीस करतायत. सध्या बेरेटाचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला आहे. तिचे कुटुंबीय किंवा नातेवाईक सापडले नाहीत, तर प्रशासनाकडून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.