सावध व्हा! मुलं स्वत:तच रमतायत, स्पर्श केल्यास चिडतायत? ही आहेत गंभीर विकाराची लक्षणं

World Autism Awareness Day 2024 : पालकांनो, गंभीर आजारापासून स्वत:च्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्या वर्तणुकीवर, लहानसहान हालचालीवर लक्ष ठेवा. 

सायली पाटील | Updated: Apr 2, 2024, 12:53 PM IST
सावध व्हा! मुलं स्वत:तच रमतायत, स्पर्श केल्यास चिडतायत? ही आहेत गंभीर विकाराची लक्षणं  title=
World Autism Awareness Day 2024 disorder symptoms and treatment

World Autism Awareness Day 2024: एखाद्या घरात जेव्हा लहान बाळाचा जन्म होतो तेव्हा त्या घराचं नंदनवन होतं. बाळ जसजसं मोठं होत जातं तसतसा घरातील पसारा वाढतो, बोबडे बोल घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात आणि मग या बाळाच्या संगोपनासाठी  पालक स्वत:ला झोकून देतात. पण, काही क्वचित घरं अशीही असतात जिथं ही बाळं गोंधळ घालकत नाहीत. एकांतात राहतात, एकटेच खेळतात. लहानशा गोष्टीवरून अचानक चिडतात. 

मुलांच्या वागण्याबोलण्यात होणारे हे बदल अनेकदा पालकांकडून दुर्लक्षित होतात. पण, ही बाब धोक्याची ठरू शकते. कारण, अशी परिस्थिती अनेकदा मुलं Autism अर्थात स्वमग्नतेचा सामना करत असल्याकडे खुणावत असते. Autism ला वैद्यकिय भाषेत ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणून ओळखलं जातं. मुलं दोन ते तीन वर्षांची असतानाच याची लक्षणं दिसू लागतात. 

Centers for Disease Control and Prevention च्या मते ऑटिज्मचा सामना करणाऱ्या मुलांची वागणूक, त्यांचं संवाद कौशल्य आणि आकलन क्षमता इतरांहून वेगळी असते. या शारीरिक स्थितीची लक्षणं व्यक्तीनुरूप बदलतात. याच विकारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगात 2 एप्रिल हा दिवस वर्ल्ड ऑटिज्म अवेयरनेस डे म्हणून ओळखला जातो. जगापुढं स्वमग्नता म्हणजे नेमकं काय आणि त्यामागची नेमकी कारणं काय याबाबत जनजागृती केली जाते. 

हेसुद्धा वाचा : मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख

 

काय आहेत स्वमग्नतेची कारणं? 

ऑटिज्मची निश्चित कारणं समोर आलेली नसली तरीही अभ्यासकांच्या मते आनुवांशिकता आणि तत्सम गोष्टी या शारीरिक स्थितीला कारणीभूत ठरतात. त्यामुळं मुलांच्या वागण्याबोलण्यात काहीही वेगळेपणा जाणवल्यास तातडीनं वैद्यकिय सल्ला घेण्याच्या सूचना पालकांना केल्या जातात. 

काय आहेत स्वमग्नता अर्थात ऑटिज्मची लक्षणं?

  • बोलण्यास दिरंगाई 
  • एखाद्याला प्रतिसाद न देणं 
  • इतरांशी नजरेस नजर देत संवाद न साधणं 
  • समोरच्याचं म्हणणं न समजणं 
  • ठराविक गोष्टींमध्ये स्वारस्य 
  • एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं 
  • एखाद्याच्या स्पर्शानं चीड येणं 
  • यंत्रमानवी आवाजात बोलणं 
  • एकटं राहणं 
  • इतरांमध्ये जाऊन ही त्यांच्यात न मिसळणं 
  • मोठ्या आवाजानं संताप होणं 
  • एकच कृती वारंवार करत राहणं 

सध्याच्या घडीला ऑटिज्मवर योग्य उपचार सापडलेला नाही. पण, जाणकार आणि तज्ज्ञ मंडळी यावर बिहेविअर थेरेपी, संभाषण कौशल्य, ऑक्य़ूपेशनल थेरेपी अशा उपचारांच्या मदतीनं स्वमग्नतेचा सामना करणाऱ्या बाधितांवर उपचार करतात. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, या बाबत कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास वैद्यकिय सल्ला अवश्य घ्या. )