कॅन्सरवर प्रभावी उपचार करणारी 'प्रोटोन थेरपी' मिळणार अत्यल्प दरात

'प्रोटोन थेरपी' आता खारघरच्या टाटा रुग्णालयात सुरु होतेय

Updated: Feb 4, 2020, 12:19 PM IST

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : राज्यातील कॅन्सर रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कॅन्सरवर प्रभावी उपचार करणारी 'प्रोटोन थेरपी' आता खारघरच्या टाटा रुग्णालयात सुरु होत आहे. याद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना अत्यल्प अथवा मोफत उपचार घेता येणार आहेत. 

खारघर टाटा रुग्णालयाच्या गेटमधून उजवीकडे असलेली ६ हजार ५०० स्केअर फूट जागेतील अद्ययावत वास्तू कॅन्सर रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णांसमोर किमो, सर्जरी आणि रेडीएशन थेरपी हे पर्याय असतात. पण रेडीएशन प्रकारात मोडणारी 'प्रोटोन थेरपी' ही या सर्वात अत्याधुनिक मानली जाते.

विदेशात या थेरपीची किंमत ७० लाखांच्या घरात असून भारतातही यासाठी साधारण ४० लाखांचा खर्च येतो. भारत सरकारतर्फे आर्थिकदृष्ट्या कमजोर गटासाठी ही सुविधा मोफत मिळू शकणार आहे. 

भारत सरकारच्या एटॉनॉमिक सेंटरतर्फे ही प्रोटोन थेरेपी सुरु असून आर्थिकृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प दरात इथे उपचार उपलब्ध होणार असल्याचे अॅट्रॅक्ट सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी म्हटले. 

इतर उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या ट्यूमरसोबत इतर निरोगी पेशींनाही हानी पोहोचते. तसेच शरीरावर डाग राहतात.. पण प्रोटॉन बीममध्ये केवळ ट्यूमरला लक्ष्य केले जाते. यातून कोणतेही डाग राहत नाहीत. 

इतर ऑपरेशनमध्ये जास्त वेळ लागतो, रुग्णाला त्रास जाणवतो पण प्रोटोन थेरपीमध्ये तुलनेत वेळ कमी लागतो. इतर उपचार पद्धतीमध्ये रुग्णाचे शरीरावरील केस गळतात. पण प्रोटोन थेरपीमध्ये केस गळती होत नाही. 

आयबीए कंपनीतर्फे इथे साधारण हजार टनची आधुनिक यंत्रणा बसवण्याचे काम सुरु आहे. ही यंत्रणा प्रोटोन थेरपीद्वारे कॅन्सरवर प्रभावी उपचार करते. साधारण ७०० कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प आहे. 

संचालक राकेश पाठक यांच्या नेतृत्वाखाली आयबीएच्या १३ इंजिनिअर्सची टीम सध्या या यंत्रणेवर काम करत असून वर्षाअखेरी पर्यंत ही यंत्रणा कॅन्सर रुग्णांना प्रोटोन थेरपीसाठी उपलब्ध होणार आहे. 

काहीजण लाखो रुपये खर्च करुन परदेशी हे उपचार घेतात पण आपल्या देशातील सर्वसामान्यांना देखील याचा लाभ मिळणार असल्याचा आनंद संचालक राकेश पाठक यांनी 'झी २४ तास'शी बोलताना व्यक्त केला. 

प्रोटोन थेरपी दरम्यान रुग्णाला शरीरात कमजोरी जाणवत नाही. तो नियमित कामं देखील करु शकतो. रोज किंवा दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिंटे अशी ७ ते ४० दिवसांपर्यंत ही उपचार पद्धती चालते आणि हळूहळू ट्यूमर कमी होत जातो. 

या सेंटरमध्ये रोज साधारण ४० ते ५० कॅन्सर रुग्ण या थेरपीद्वारे उपचार करु शकणार असून त्यांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे.