मुंबई : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीचा सामना करतोय. या महामारीने या दोन वर्षांमध्ये अनेक लोकांचे प्राण घेतले. कोरोनानंतर आता प्रत्येकजण आपापल्या आरोग्याबाबत जागृत झाला आहे. मात्र कोरोना हा काही केवळ एकच आजार नाहीये. त्यामुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांकडेही आपण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया जीवनशैलीसंदर्भातील आजारांबद्दल.
गेल्या काही दशकांपासून हृदयासंबंधी आजारांची संख्या वाढताना दिसतेय. यामागील कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
धुम्रपान आणि पर्यावरणामधील प्रदूषण यामुळे श्वसनाचे आजार वाढत असून रूग्णसंख्याही वाढतेय. शिवाय कोरोनामुळे या रूग्णसंख्येत अजून भर पडली आहे. आजच्या घडीला दहाव्या व्यक्तीचा मृत्यू हा श्वसनाच्या आजारामुळे होतो.
गेल्या दोन दशकांपासून कॅन्सर आणि ट्यूमरच्या रूग्णांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचं दिसतंय. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचं सेवन, सिगारेटचं सेवन, प्रदूषण तसंच आनुवांशिकता ही कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला कारणीभूत ठरतात.