हैदराबाद : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात रंगणाऱ्या मुद्द्यांची जेवढी चर्चा आहे तेवढीच अजून एका मुद्यासाठी विधानसभा चर्चेत आली आहे. तो मुद्दा म्हणजे आमदारांच्या सुट्ट्यांचा.
एक, दोन नव्हे तर १०० आमदारांनी एकाच वेळी सुट्टी घेतली आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत हा प्रकार समोर आला आहे.
आंध्र प्रदेशमध्ये सध्या लग्न समारंभाचे वातावरण आहे. ५०-६० हजार नव्हे तर १ लाख २० हजार विवाह होणार आहेत. सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या १०० आमदारांनी सुटीसाठी अर्ज केला आणि तो मंजूरही झाला.
एकावेळी इतक्या आमदारांनी सुटी टाकली कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर एकावेळी इतक्या आमदारांना सुटी कशी दिली हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या आमदारांच्या अर्जाला विधानसभाध्यक्षांनी मंजुरी दिली असल्याने अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यात सभागृहात बहुसंख्य आमदार गैरहजर असतील.
एकाच वेळी १०० आमदार रजेवर गेल्याने आमचे प्रश्न कोण उपस्थित करणार असा प्रश्न जनतेतर्फे विचारला जात आहे. याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.