चेन्नई : कधी कधी माणसाची छोटीची चूक पण त्याला महाग पडते. तर कधी कधी मोह देखील माणसाला कधीना कधी चांगलीच ठोकर लावतो. असंच एका दुकानदाराला छापील किंमतीपेक्षा दोन रुपये जास्त घेण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. ११ वर्षांपूर्वी दोन रुपये जास्तीचा नफा कमविण्याचा मोह त्याला ११ वर्षानंतर चांगलाच भारी पडला. यासाठी त्याला १२ हजारांचा दंड नुकसान भरपाई म्हणून द्यावा लागला.
ऑगस्ट २००६ मध्ये हा सर्व प्रकार घडला होता. खजुराच्या पाकिटावर दुकानदाराने २ रुपये जास्त घेतल्याचा खटला तब्बल ११ वर्ष न्यायालयात सुरू होता. केवीन जोसेफ रेबलो नावाच्या व्यक्तीने हा खटला दाखल केला होता. केविन यांनी ऑगस्ट २००६ मध्ये सुपरमार्केटमधून २०० ग्रॅम वजनाच्या खजुराचे पाकीट विकत घेतले होते. या पाकिटावर विक्री मूल्य १३ रुपये होते, मात्र दुकानदाराने आपल्याकडून १५ रुपये घेतल्याचा आरोप तक्रारदाने केला होता. तसेच त्या पाकिटाची विक्रीची मुदतही संपून गेली होती असही तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं. तब्बल ११ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असून ग्राहक न्यायालयाने केवीन यांना १२ हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दुकानदाराला दिला आहे.