Liquid Nitrogen Paan: दुपारी किंवा रात्री काही चमचमीत खाल्ल्यानंतर पान खाल्लं जातं. पान खाण्याचा मुख्य उद्देश हा की जेवण पचते. मात्र, हल्ली पान खाण्याचा हा ट्रेंडच झाला आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पान आले आहेत. चॉकलेट पान, फायर पान, नायट्रोजन पान यासारखे अनेक पानांचे प्रकार आहेत. मात्र, बंगळुरात एक पान खाल्ल्यामुळं मुलीसोबत भयानक प्रकार घडला आहे. 12 वर्षांच्या एका मुलीने लिक्विड नायट्रोजन पान खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली आहे.
12 वर्षांच्या मुलीने इतर मुलांना पानाच्या दुकानात लिक्विड नायट्रोजन पान खाताना पाहिलं. त्यांना पाहून तिनेही तेच पान ऑर्डर केले. मोठ्या आवडीने तिने ते पान खाल्लं मात्र, पान खाताच तिची प्रकृती खालावली. तिला अस्वस्थ वाटू लागले इतकंच नव्हे तर तिच्या पोटातही दुखू लागले. मुलीची ही अवस्था पाहून तिला कुटुंबीयांनी लगेचच रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
मुलीच्या पोटात एक छिद्रे पडल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी तिला तु काही खाल्ले होतेस का हे विचारताच तिने स्मोक पान खाल्ल्याचे सांगितले होते. पान खाल्ल्यानंतर सगळीकडे धुर झाला होता. पण तिथे असलेले सगळेच जणे मोठ्या आनंदाने पान खात होते. मात्र, कोणालाच काही त्रास झाला नाही. पण मला हा त्रास का झाला? असा सवाल मुलीने केला होता. मात्र डॉक्टरांकडेही तिच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते.
मुलीवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. शस्त्रक्रिया केली नाही तर तिच्या पोटातील छिद्र आणखी वाढू शकत होते. दोन दिवस मुलीवर आयसीएयूमध्ये उपचार सुरू होते. मुलीवर इंट्रा-ऑप ओजीडी स्कोपी आणि स्लीव गॅस्ट्रेक्टोमीसोबतच एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी या शस्त्रक्रीया करण्यात आल्या. त्यानंतर सहा दिवसांनी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच एक घटना 2017मध्येही समोर आली होती. एका व्यक्तीने नायट्रोजन कॉकटेल प्यायल्यानंतर त्यालाही अशाच प्रकारचा सामना करावा लागला होता.
"लिक्विड नायट्रोजन, 20 अंश सेल्सिअसवर 1:694 च्या द्रव-ते-वायू विस्तार गुणोत्तरापर्यंत गेल्यास त्याचा आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मर्यादित जागेत द्रव नायट्रोजनचे जलद बाष्पीभवन लक्षणीय तणाव निर्माण करते. त्यामुळे नुकसान होऊ शकते. याचा त्वचेसाठी आणि स्वयंपाकघरातील कामगारांना किंवा अन्न हाताळणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असा एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.