टीव्ही अँकरला सुनावल्यानंतर कॉमेडियनवर दोन एअरलाईन्सची बंदी

मंगळवारी कामरा यानं मुंबई ते लखनऊ या आपल्या विमान प्रवासादरम्यान एका कथित पत्रकार आणि टीव्ही अँकरला डिवचलं होतं

Updated: Jan 29, 2020, 12:37 PM IST
टीव्ही अँकरला सुनावल्यानंतर कॉमेडियनवर दोन एअरलाईन्सची बंदी

नवी दिल्ली : आपल्या 'ह्युमर'नं तरुणाईला खळखळून हसवणाऱ्या स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्यावर दोन विमान कंपन्यांनी बंदी घातलीय. कुणाल कामरा यानं एका टीव्ही अँकरला विमानातच सुनावल्यानं इंडिगो एअरलाईन्स आणि एअर इंडिया या दोन विमान कंपन्यांनी त्याच्यावर कारवाई केलीय.

मंगळवारी कामरा यानं मुंबई ते लखनऊ या आपल्या विमान प्रवासादरम्यान एका कथित पत्रकार आणि टीव्ही अँकरला डिवचलं होतं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला व्यक्तीगतरित्या त्रास दिल्याबद्दल 'इंडिगो'नं कामरावर सहा महिन्यांची बंदी घातलीय तर एअर इंडियानं पुढच्या नोटिशीपर्यंत कामरावर प्रवासबंदी घातलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, पत्रकाराला डिवचल्याच्या घटनेची नोंद नागरिक उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी घेतली. त्यानंतर त्यांनीच भारतातील इतर एअरलाईन्सलाही कामरावर बंदी घालण्याचा सल्ला दिला. 

'एखाद्याला डिवचण्याचा आक्षेपार्ह व्यवहार तसंच विमानात अराजकता निर्माण करणारा व्यवहार अस्वीकारार्ह आहे. विमान प्रवाशांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो', असं हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलंय. 

यावर इंडिगोनं ट्विट करत कंपनी कुणाल कामरावर सहा महिन्यांची बंदी घालत असल्याचं म्हटलं. 'आम्ही आमच्या प्रवाशांनाही सल्ला देऊ इच्छितो की विमानात व्यक्तीगत छेडछाड करण्यापासून दूर राहा. कारण तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेला हा संभावत: धोका ठरू शकतो'.

त्यानंतर एअर इंडियानंही एक ट्विट करत पुढच्या सूचनेपर्यंत कुणाल कामरा यांच्या विमान प्रवासावर बंदी घालत असल्याचं जाहीर केलं.