Manipur Violence: 200 शस्त्रधाऱ्यांनी घरात घुसून केलं पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण, लष्कराला पाचारण

Manipur Violence: मणिपूरमध्ये तणाव वाढला असून लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. याचं कारण मेईती संघटना अरामबाई तेंगगोलच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण केलं.    

शिवराज यादव | Updated: Feb 28, 2024, 11:30 AM IST
Manipur Violence: 200 शस्त्रधाऱ्यांनी घरात घुसून केलं पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण, लष्कराला पाचारण title=

Manipur Violence: मणिपूरमध्ये तणाव वाढला असून लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. याचं कारण मेईती संघटना अरामबाई तेंगगोलच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण केलं.  इम्फाळ पूर्व जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचे अपहरण करण्यात आलं. मणिपूर पोलिसांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, इंफाळ पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांची नंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जलद कारवाई करत सुटका केली.

अमित सिंग हे मणिपूर पोलीस दलात ऑपरेशन्स विंगमध्ये तैनात होते. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करणयात आलं असून, प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी जवळपास अरामबाई तेंगगोलशी संबंधित 200 शस्त्रधारी त्यांच्या घरात घुसले होते. यावेळी त्यांनी तोडफोड केला. तसंच गोळ्या चालवत 4 वाहनांचं नुकसान केलं. 

पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूरमध्ये तणाव वाढला असल्याने लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच इम्फाळ पूर्व येथे आसाम रायफल्सच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

या घटनेची माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितलं आहे की, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली. वाहनांमधून आलेल्या तब्बल 200 जणांनी अमित सिंग यांच्या घऱात घुसखोरी केली. 

"27 फेब्रुवारी 2024 रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या घरावर गोळीबाराची घटना घडली आहे. सुमारे 200 वाहनांतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोइरंगथेम अमित सिंग यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. सशस्त्र हल्लेखोरांनी निवासस्थानी घरगुती मालमत्तेची तोडफोड केली,” अशी माहिती मणिपूर पोलिसांनी एक्सवर दिली आहे. 

“माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कारवाईत रबिनश मोइरांगथेम आणि खोंगमन बाशीखाँग हे जखमी झाले असून त्यांना जेएनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  यादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या एका एस्कॉर्टचे सशस्त्र बदमाशांनी अपहरण केलं. नंतर त्यांना क्वाकीथेल कोन्जेंग लीकाई परिसरातून सोडवण्यात आलं आणि वैद्यकीय उपचारासाठी राज मेडिसिटीमध्ये दाखल करण्यात आलं. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे,” अशीही माहिती देण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याचे वडील एम कुल्ला यांनी सांगितलं की, "आम्ही घराच्या आवारात घुसलेल्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी अचानक वाहनं आणि इतर मालमत्तेवर गोळीबार सुरु केला. आम्हाला जीव वाचवण्यासाटी अखेर आतमध्ये पळावं लागलं".

जमावाने पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला का केला? 

संबंधित अधिकाऱ्याने वाहन चोरीच्या आरोपात गटातील सहा सदस्यांना अटक केली होती, असं वृत्त पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलं आहे. या अटकेनंतर मीरा पायबिस (मेईटी महिला गट) च्या गटाने त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी निषेध केला आणि रस्ते अडवले. यानंतर काहीजणांनी त्यांच्या घऱात घुसून अपहरण केलं. 

दरम्यान मणिपूर पोलिसांना अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. यासाठी त्यांना सुरक्षा दलाची मदत घेतली. काही तासात त्यांनी अधिकाऱ्यांची सुरक्षित सुटका केला. बचाकार्यादरम्यान स्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लष्कराची मदत घ्यावी लागली.