'त्या रात्री अंकल घरी आले होते'; 5 वर्षांच्या मुलाचा जबाब, अन् महिलेच्या हत्येचा छडा लागला

Women Died In Her House: २६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू, नाकातून रक्त येत होतं; पाच वर्षांच्या मुलाने सांगितलं त्या रात्री काय घडलं होतं, अन् पोलिसांनी लगेचच सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 5, 2023, 01:41 PM IST
'त्या रात्री अंकल घरी आले होते'; 5 वर्षांच्या मुलाचा जबाब, अन् महिलेच्या हत्येचा छडा लागला title=
26 years old woman strangled by her lover in delhi

नवी दिल्लीः २६ वर्षांच्या महिलेची तिच्याच घरात गळा घोटून हत्या करण्यात आली आहे. भीषण म्हणजे, महिलेची दोन मुलं घरात असतानाच आरोपीने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून रविवारी सकाळी पोलिसांना घरात महिलेचा मृतदेह सापडला असल्याचा फोन आला. तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येचे कारण ऐकून महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी एका घरात महिलेची हत्या झाल्याचा पीसीआर कॉल आला होता. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर पहिल्या मजल्यावर नेहाचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी पोस्टमार्टम करुन मृतदेह तिच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. 

नेहाचे पती पवन यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा घडला त्या दिवशी ते रात्रपाळी करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी आले तेव्हा घरातील लाइट बंद होती व नेहा जमिनीवर पडलेली होती. तिच्या नाकातून रक्त येत होते. तर, दोन्ही मुलं तिच्याजवळ बसून रडत होते. त्यानंतर पवन यांनी त्यांचा मोठा भाऊ आणि वहिनीला बोलवून घेतले. 

पवन याने मुलांना काय घडलं याबाबत विचारलं असता त्याने सांगितलेली माहिती ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. घटना घडली त्यादिवशी एक काका घरी आले होते. त्यानंतर ते आईने आम्हाला बाजूच्या खोलीत झोपवलं. 

मुलाने दिलेली माहिती कळताच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा अनिल साहू उर्फ अर्जुन नेहाच्या घराकडे येताना दिसत होता. त्यानंतर पोलिसांनी नेहाचे कॉल रेकॉर्डदेखील तपासले. त्यानंतर पोलिसांचा अर्जूनवर असलेला संशय अधिक बळावला. अर्जूनला ताब्यात घेण्यासाठी त्यांनी त्याच्या घरात छापेमारी केली मात्र तो तिथे नव्हता. 

पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी करत अखेर रविवारी त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला नरेला रेल्वे स्थानकावरुन अटक करण्यात आले आहे. तो फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 

आरोपीची चौकशी करत असताना धक्कादायक सत्य समोर आलं आहे. आरोपीचे लग्न झालेले नसून अविवाहित आहे. त्याचे नेहावर प्रेम होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नेहा इतर मुलांसोबतही संपर्कात असल्याचं त्याला कळलं. त्यावरुन दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. घटना घडली त्यादिवशी देखील त्यांच्यात याच गोष्टीवरुन वाद विवाद झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात अर्जूनने नेहाची गळा घोटून हत्या केली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अर्जूनविरोधात हरि नगर आणि राजौरी गार्डन ठाण्यात चोरी आणि झटापट यासारख्या दहा प्रकरणात तक्रार दाखल आहे. तर, नेहा मुळ बिहार राज्यातील आरा जिल्ह्यातील रहिवाशी होती. ती तिच्या पती व दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांच्या दाव्यानुसार, महिलेचे आरोपी अर्जूनसोबत अनैतिक संबंध होते.