नवी दिल्ली : काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर आता तेलुगु देसम पक्षालाही बंडाळीचं ग्रहण लागलं आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला मोठा झटका बसला आहे. टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वाय एस चौधरी, सी एम रमेश, राम मोहन राव, टी जी व्यंकटेश या चार खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे या चारही खासदारांनी आपले राजीनामे सादर केले. आंध्र प्रदेशातही आता भाजपमध्ये इतर पक्षांमधून इनकमिंग सुरू झालं आहे.
या चारही खासदारांनी राज्यसभेमध्ये टीडीपीचा भारतीय जनता पक्षात विलिनीकरणाचा प्रस्ताव पास केला. यानंतर याची माहिती राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांना दिली गेली. राज्यसभेत टीडीपीचे एकूण ६ खासदार आहेत. आता टीडीपीचे फक्त २ खासदार शिल्लक आहेत. पण टीडीपीच्या या खासदारांवर पक्ष बदलाचा कायदा लागू नाही होणार. पक्षाच्या २/३ खासदारांना आपल्या पक्षाचं विलिनीकरण करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे हे चारही खासदार राज्यसभेचे सदस्य राहणार आहेत.
टीडीपीच्या या चारही खासदारांनी पत्रकार परिषद घेत भाजपमध्ये सहभागी बोत असल्याची घोषणा केली. भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश झाला. टीडीपीचे हे चार खासदार भाजपमध्ये त्यावेळी सहभागी झाले जेव्हा टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे आपल्या कुटुंबासोबत परदेशात गेले आहेत.
टीडीपी अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं की, 'आम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी भाजपसोबत संघर्ष केला. त्यासाठी एनडीएमधून बाहेर पडून केंद्रीय मंत्रीपद देखील सोडले. भाजप टीडीपीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. याची आम्ही निंदा करतो. टीडीपीवर हे संकट मोठं नाही आहे. पक्षाच्या नेत्यांना निराश होण्याची गरज नाही.'
आंध्र प्रदेश विधानसभामध्ये भाजपचा एकही आमदार नाही. मागच्या विधानसभेत भाजपला ५ जागा मिळाल्या होत्या. मागच्या निवडणुकीत भाजपने टीडीपीसोबत युती केली होती. पण टीडीपी एनडीएमधून बाहेर पडली. त्यामुळे आता चंद्रबाबु भारतात आल्यानंतप पक्षाची पुढची रणनीती ठरवतील.
लोकसभा निवडणुकीत टीडीपीचा मोठा पराभव झाला होता. राज्यातील २५ पैकी फक्त ३ जागा त्यांना मिळाल्या होत्या. वायएसआर काँग्रेसला २२ जागा मिळाल्या होत्या. तर विधानसभा निवडणुकीत टीडीपीला १७५ पैकी फक्त २३ जागा मिळाल्या होत्या. वायएसआर काँग्रेसला १५१ जागा मिळाल्या होत्या. तर जनसेना पक्षाला एक जागा मिळाली होती.