'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात

400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 9, 2024, 09:21 AM IST
'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात title=
कॅनडामधील चोरीसंदर्भात पोलिसांचा दावा

400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा अशी ओळख असलेल्या चोरीतील 400 किलो सोनं भारतात असल्याची शंका कॅनडामधील तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. जगातील सर्वात मोठ्या दरोड्यांमध्ये गणना होत असलेल्या झ्युरिक येथील विमानामधून चोरी झालेल्या 183 कोटींच्या (30 मिलियन कॅनडीयन डॉलर्स) सोन्यासंदर्भातील हा धक्कादायक दावा आता करण्यात आला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

स्वित्झर्लंडची राजधानी असणाऱ्या झ्युरिक येथून 17 एप्रिल 2023 रोजी एक कार्गो विमान कॅनडामधील टोरांटोला पोहोचलं. या विमानात स्वित्झर्लंडमधील एका रिफायनिंग कंपनीच्या मालकीच्या 6600 सोन्याच्या विटा होत्या. तसेच 1.9 मिलियन डॉलर इतकी कॅनडीयन चलनातील रक्कमही विमानात होती. ही रक्कम वँकुवर येथील बुलियन अँड करन्सी एक्सचेंजमध्ये पोहोचवणं अपेक्षित होतं. जवळपास 400 किलो सोनं आणि एकूण रक्कम असा साधारण 200 कोटी रुपयांचा ऐवज वाहून आणणाऱ्या विमानाच्या सुरक्षेची काळजीच घेतली न गेल्याने मोठा दरोडा पडला. सोन्याच्या या 6600 विटा .9999 टक्के शुद्ध सोन्याच्या होत्या.

सदर विमान कॅनडामध्ये लॅण्ड झाल्यानंतर एक पांढऱ्या रंगाचा भलामोठा ट्रेलर टोरांटो विमानतळावर दाखल झाला. या ट्रक चालकाकडे सदर विमानामधील माल घेऊन जाण्यासंदर्भातील कागदपत्रं होती. विमानातील सोनं तसेच पैसे उतरवण्यात आलेल्या गोदामातील सुरक्षारक्षकांना या चालकाने सदर कागदपत्रं दाखवली. मात्र या शिपमेंटमध्ये नेमकं काय होतं याची माहिती सुरक्षारक्षकांना नव्हती. चोरीच्या उद्देशाने ट्रक घेऊन आलेल्या चालकाने या शिपमेंटमध्ये मासळी असून तीच घेऊन जायची असल्याचं सांगितलं. सुरक्षारक्षकांनी कथित कागदपत्रांवर विश्वास ठेऊन विमानातून आलेला सर्व माल मासळी समजून या ट्रकमध्ये भरण्यासाठी चालकाकडे सुपूर्द केला. काही मिनिटांमध्ये हा ट्रक विमानतळावरुन निघाला दिसेनासा झाल्यानंतर काही तासांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

ऑपरेशन 24 कॅरेट

18 एप्रिल 2023 रोजी या चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि तपास सुरु झाला. सुरुवातीला पोलिसांनी त्या पांढऱ्या ट्रकचा शोध घेण्यासाठी 'ऑपरेशन 24 कॅरेट' सुरु केलं. पोलिसांनी गोदाम, विमानतळ आणि रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही तपासले. तो ट्रक मुख्य रस्त्यांवरून कोणत्या उपरस्त्यावर तर गेला नाही, याचीच भीती पोलिसांना होती आणि शेवटी तेच झालं. जवळपास 20 मैल तो ट्रक कुठवर गेला याची माहिती मिळवल्यानंतर लगेचच तो नजरेआड झाला. तिथून पुढं या ट्रकचा माग पोलिसांना काढता आला नाही. 

चोरीचं भारत कनेक्शन

तपासामध्ये दोन कॅनडीयन भारतीयांचा या कटामध्ये प्रमुख सहभाग होता अशी माहिती समोर आली आहे. यात 54 वर्षीय परमपाल सिंधू नावाच्या व्यक्तीचा समावेश असून त्याला मे महिन्यात अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये भारतीय वंशाच्या एअर कॅनडामधील एका माजी मॅनेजरचाही समावेश असल्याची खळबळजनक बाब समोर आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 2023 मध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या या चोरीनंतर तो 31 वर्षीय सिमरनप्रीत पनेसर नामक मॅनेजर नोकरीचा राजीनामा देऊन दुबईहून भारतात परतला. हळुहळू पोलिसांना या चोरीत सहभागी असणाऱ्या इतरांचीही माहिती मिळवली. या माहितीनुसार सिंधूचा मित्र असलेल्या 36 वर्षीय अर्चित गोव्हर यालाही मे महिन्यात कॅनडा पोलिसांनी अटक केली. तो भारतातून कॅनडामध्ये गेला असता त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर बरोबर एका वर्षाने म्हणजेच 17 एप्रिल 2024 रोजी कॅनडामधील वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी एकूण 19 जणांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये सिंधूबरोबरच 40 वर्षीय अमित जलोटा, 43 वर्षीय अमंद चौधीर, 37 वर्षीय अली राझा, 35 वर्षीय पर्शत परमलिंगम यांचा समावेश आहे. 42 वर्षीय अर्सनल चौधरी नावाच्या व्यक्तीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

भारतात आणून सोनं विकल्याची शंका

पिल पोलीस सर्व्हिस बोर्डाने या चोरीतील बरेचसे सोने कधीच रिकव्हर करता येणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. डिटेक्टीव्ह सार्जंट माईक मार्व्हिटी यांनी, "आम्हाला असं वाटत आहे की चोरीतील बराचसा भाग हा आतापर्यंत परदेशात नेण्यात आला आहे. हा माल दुबई किंवा भारतात नेला असावा असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी सोन्याच्या विटांवरील सिरीअल नंबर्स काढून ते वितळवून विकण्यात आलं असावं. चोरीच्या काही आठवड्यांमध्येच हे सारं करण्यात आल्याने आता हे सोनं रिकव्हर करणं कठीण आहे," असं म्हटलं आहे.

कसा उघड झाला गुन्हा?

2 डिसेंबर 2023 रोजी अमेरिकेतील पेन्सेल्वेनिया येथे पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणाला वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली. या इसमाच्या वाहनाच्या तपासणीदरम्यान मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हा 25 वर्षीय तरुण अमेरिका आणि कॅनडामध्ये हत्यारांच्या तस्करीत सहभागी होता. धक्कादायक बाब म्हणजे याच इसमाने कॅनडातील टोरांटोला विमानतळाच्या गोदामातून सोन्याची चोरी करणारा ट्रक पळवला होता. हा चालक चोरी करण्यासाठी फसवं बिल देत गोदामात प्रवेश करत होता तेव्हा त्यानं अनावधानानं हातमोजा काढला. त्यामुळं तिथं त्याच्या हातांचे ठसे उमटले आणि यावरुनच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. ज्यानंतर अमेरिकेतील पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पाहिली असता हे ठसे जुळले. पोलिसांनी  या प्रकरणात सहाजणांना ताब्यात घेतलं असून त्यापैकी पाचजण कॅनडाचेच नागरिक होते. 

चोरांनी टोरी केलेल्या 6600 सोन्याच्या विटांपैकी अनेक विटा वितळवून त्या स्वरुपात विकल्याचं स्पष्ट झालं आहे विटांवर असणारे अनुक्रमांक त्यांच्या विक्रीत अडथळा निर्माण करत असल्याने त्या वितळवून त्यापासून चोरट्यांनी पैसा कमवला. आतापर्यंत पोलिसांना त्या सोन्यातून तयार करण्यात आलेले अवघे 6 ब्रेसलेट हाती लागले. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं असूनही चोरीला गेलेला बराच ऐवज अद्याप हाती लागलेला नाही.