इमारतीला लागलेल्या आगीत ७०हून अधिक जणांचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या २००हून अधिक कर्मचाऱ्यांना पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

Updated: Feb 21, 2019, 11:26 AM IST
इमारतीला लागलेल्या आगीत ७०हून अधिक जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत ७०हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीबाबत माहिती दिली. 'सिन्हुआ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नागरी संरक्षण क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आगीत मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीत आतापर्यंत ७०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ढाकातील चौक बाजार भागात बुधवारी रात्री एका चार मजली इमारतीला आग लागली. त्यानंतर या आगीमुळे परिसरातील इतर इमारतींनाही नुकसान पोहचवले आहे. आग लागल्याच्या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. २००हून अधिक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. इमारतीत ठेवण्यात आलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे तसेच प्लास्टिक आणि इतर काही सामानामुळे आग अधिक जलद गतीने पसरली गेल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. 

आगीत जखमी झालेल्या ५०हून अधिक जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आगीच्या दुर्घटनेनंतर ढाका मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयात शेकडोंच्या संख्येने रूग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x