7th pay commission : दिवाळी (Diwali 2022) तोंडावर आलीये, सर्वजण खात्यात असणाऱ्या रकमेनुसार आणि कंपन्यांकडून मिळणाऱ्या दिवाळी बोनसच्या (Diwali bonus) बळावर हा सण साजरा करण्याची गणितं मांडू लागली आहेत. पण, सरकारी कर्मचारी (Government Employees) मात्र या आकडेमोडीपासून बरेच दूर असल्याचं पाहायला मिळत आहेत. याला काही कर्मचारी अपवादही असतील. पण, केंद्राच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं फार कमी घडतं. एकाएकी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मोदी सरकारकडून या कर्मचाऱ्यांना आणखी एक घसघशीत भेट देण्यात आली आहे.
महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर एलटीसी (LTC) सुविधेमध्ये दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सर्व पात्र सरकारी कर्मचारी 25 सप्टेंबर 2024 पर्यंत या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना 26 सप्टेंबर 2022 ते 25 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधेत प्रवासाच्या येण्याजाण्याचा खर्चही परत मिळतो.
हवाई प्रवास करण्याचीही परवानगी
सरकारी निर्देशात सांगितल्यानुसार केंद्राच्या सेवेत असणारे आणि या सुविधेसाठी पात्र असणारे कर्मचारी जम्मू काश्मीर (Jammu kashmir), देशाचा पूर्वोत्तर भाग (north East), लडाख (Ladakh) आणि अंदमान – निकोबारला (Andaman nicobar) जाण्यासाठी या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. इतकंच नव्हे, तर जे कर्मचारी आतापर्यंत हवाई यात्रेस पात्र नव्हते तेसुद्धा आता या राज्यांमध्ये हवाई मार्गानं प्रवास करु शकतात. कर्मचारी कोणत्याही एअरलाईन्सच्या इकोनॉमी क्लासमधून (Airplane Economy class) प्रवास करु शकतात.
फायदा घ्या पण...
कर्मचाऱ्यांनी एलटीसी सुविधेचा फायदा घ्यावा पण, या सुविधेचा दुरुपयोग करु नये असाही इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यानं असं केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.