संसदेच्या बाहेर रात्रभर उपोषण करणार, निलंबित खासदारांची प्रतिक्रिया

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान आठ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. 

Updated: Sep 21, 2020, 09:55 PM IST
संसदेच्या बाहेर रात्रभर उपोषण करणार, निलंबित खासदारांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान आठ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर निलंबित खासदार संसदेच्या प्रांगणातील गांधी पुतळ्यासमोर उपोषणाला बसले आहेत. निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत ते रात्रभर बसून राहतील असे निलंबित खासदारांचे म्हणणे आहे. हे निलंबित खासदार संसदेच्या कार्यवाहीतून निलंबनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी सातत्याने करत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी म्हटले की, 'राज्यसभेच्या उपसभापतींना कुणी हात लावला नाही.'

काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनीही उपोषणाला बसलेल्या खासदारांना पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, 'हे विधेयक शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे. शेतकरीविरोधी आहे. हे विधेयक जबरदस्तीने राज्यसभेत मंजूर झाले. डिविजन मागितला गेला पण दिला गेला नाही. राज्यसभेत बहुमत हे या विधेयकाच्या विरोधात असतानाच ते मंजूर झाले.'

गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, 'राज्यसभेत गदारोळ सुरू असताना खासदारांनी कोणालाही स्पर्श केला नाही. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना किंवा उपस्थित मार्शल यांना देखील कोणी हात लावलेला नाही. आझाद म्हणाले की, एक वाजेनंतर कामकाज वाढवायचे असेल तर त्याची हाऊस सेंस घेतलं जातं. जे खासदार नियम सांगत होते, प्रक्रिया सांगत होते, परंपरा सांगत होते, त्यांनाच सभागृहातून काढून टाकण्यात आले.'

उपोषणावर खासदार ठाम

उपोषणाला बसलेले खासदार रात्रभर धरणे आंदोलनाला बसतील. उद्या राज्यसभेत निलंबनाबाबत काय निर्णय होतो, त्यावर पुढील गोष्ट अवलंबून असेल असे खासदारांचे म्हणणे आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, 'उद्या राज्यसभेवर आमचे निलंबन मागे घेतले जाते की नाही यावर आमचे उपोषण अवलंबून असेल.'