तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील एक ह्रदयदावक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलाने उंच इमारतीच्या 35 व्या मजल्यावरुन उडी मारत टोकाचं पाऊल उचललं. इमारतीवरुन खाली पडल्यानंतर जागीच मुलाचा मृत्यू झाला. यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि परिस्थितीची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, मुलाने टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती पोलीस घेत आहेत. अभ्यासाच्या दबावामुळे त्याने हे पाऊल उचललं असावं अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हैदराबादमध्ये ही घटना घडली. येथे एका 14 वर्षाच्या मुलाने इमारतीच्या 35 व्या मजल्यावरुन खाली उडी मारत आत्महत्या केली. मृत मुलगा हा 10 वीत शिकत होती. त्याचे आई-वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. मुलाने इमारतीवरुन उडी मारण्याचं टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या आईला एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्याने लिहिलं होतं की, "मला हे पाऊल उचलावं लागत आहे याचं दु;ख आहे. माझ्या छोट्या भावाची काळजी घे".
मुलाने पाठवलेला मेसेज पाहून त्याची आई प्रचंड घाबरली होती. यानंतर त्यांनी तात्काळ घर गाठलं. पण मुलगा घरात नव्हता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेऊनहा काही थांगपत्ता लागत नव्हता. यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुलाच्या आईने तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अखेर मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटमधील दुसऱ्या ब्लॉकमध्ये त्याचा मृतदेह आढळला.
मुलाने संध्याकाळी 7 वाजता हा संदेश पाठवला होता. पण पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं असता ते कॉम्प्लेक्समधून बाहेर पडलाच नसल्याचं स्पष्ट झालं होतं. दरम्यान, इमारतीमधील सीसीटीव्हीत तो लिफ्टने वर जात असल्याचं दिसलं होतं. यानंतर तो दिसला नव्हता.
मुलाचा मृतदेह मिळाला असल्याची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी तेथील काही लोकांकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं याची माहिती घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, मुलाने शैक्षणिक तणावापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणी शाळा प्रशासन, शिक्षक आणि मुलाच्या मित्रांकडे चौकशी करणार आहेत. प्राथमिक तपासात 15 वर्षीय मुलाने गेमिंग कन्सोलसमोर बरेच तास घालवले आणि शैक्षणिक तणावाचा सामना केला ज्यामुळे त्याला टोकाचे पाऊल उचलले असं दिसत आहे.