बिडी पेटवल्यानंतर काडी रस्त्यावर फेकली अन् पुढच्या क्षणी...; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 21, 2024, 08:36 PM IST
बिडी पेटवल्यानंतर काडी रस्त्यावर फेकली अन् पुढच्या क्षणी...; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ title=

सिगारेट आरोग्यासाठी धोकादायक आहे हे सर्वश्रुत आहे. पण धुम्रपान करणं हे अनेकदा इतरांसाठीही धोकादायक ठरु शकतं. आंध्र प्रदेशात अशीच एक घटना घडली असून, एका व्यक्तीच्या धुम्रपानाची शिक्षा सर्वांना भोगावी लागली आहे. एका व्यक्तीने धुम्रपान करताना अनेक दुकानं आगीत जाळून खाक करुन टाकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्थानिकांनी प्रसंगावधना दाखवल्याने अजून होणारं नुकसान टाळता आलं. 

ही घटना अनंतपूर जिल्ह्यातील कल्याणदुर्गम शहरात बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. एका व्यक्तीने पाच लिटर पेट्रोल विकत घेतलं होते. पण तो दुचाकीवरून जात असताना कंटेनरमधून गळती झाल्याचं सांगण्यात आलं आहे. रस्त्यावर अनेक दुकानं असणाऱ्या ठिकाणीच ही गळती झाली होती. यावेळी तिथे अनेक वाहनंही उभी होती. 

सीसीटीव्हीत नेमकं काय?

सीसीटीव्ही दिसत आहे की, दोन व्यक्ती दुकानाजवळ उभे राहून गप्पा मारत असतात. त्यांच्यासमोर रस्त्यावर पेट्रोल सांडलें दिसत आहे. यादरम्यान एक व्यक्ती बिडी बाहेर काढतो आणि ती पेटवतो. यानंतर तो पेटती काडी रस्त्यावर फेकून देतो जी थेट सांडलेल्या पेट्रोलवर पडते. यानंतर आग पेटते आणि काही कळण्याआधी तिथे उभ्या दुकानं, गाड्यांनाही भस्म करते. 

दरम्यान व्हिडीओत धुम्रपान कऱणारा आणि इतरजण सुरक्षित ठिकाणी धावताना दिसत आहेत. दुसरीकडे ज्यांच्या दुचाकी पार्क आहेत ते त्या आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. या आगीत दुकानं आणि दुचाकी जळून मोठं नुकसान झालं आहे.

मे महिन्यात, हातात पेटलेली सिगारेट घेऊन झोपल्यामुळे 28 वर्षीय व्यक्तीचा कोलकात्याच्या घरी गुदमरून मृत्यू झाला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आग लागली तेव्हा सप्तर्षी मित्र झोपले होते आणि त्यांच्या बेडशीट आणि गादीला आग लागली. जाग आल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत खूप उशीर झाला होता.