राजस्थानच्या जयपूरमध्ये रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सवाई मान सिंग हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. हे सरकारी रुग्णालय आहे. अपघातानंतर दाखल झालेल्या रुग्णाला रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी चक्क AB+ च्या जागी O+ रक्त दिलं. यामुळे 23 वर्षीय रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सरकारने याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदीकुई शहरात वास्तव्यास असणाऱ्या 23 वर्षीय सचिन शर्माचा कोटपुतली शहरात अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर सचिनला जयपूरच्या सवाई मान सिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सचिन शर्मावर उपचार सुरु असताना ट्रॉमा सेंटरमधील वॉर्ड बॉयने त्याला AB+ च्या जागी O+ रक्त चढवलं.
चुकीचं रक्त दिल्यानंतर सचिनच्या दोन्ही किडन्यांमध्ये त्रुटी निर्माण झाली. त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आलं होतं. प्रयत्न करुनही त्याच्या प्रकृतीत सुधार होत नव्हता. त्याची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
"सचिन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ही बाब समोर आली," अशी माहिती एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक अचल शर्मा यांनी दिली आहे. तसंच याप्रकरणी एक तपास समिती गठीत करण्यात आली असून, त्यांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.
अपघातानंतर सचिनचं बरंच रक्त वाहून गेलं होतं. यामुळे डॉक्टरांनी सचिनला रक्त चढवण्यास सांगितलं होतं. सचिनला AB+ रक्त हवं होतं. पण वॉर्डबॉयने दुसऱ्या रुग्णाची O+ रक्ताची चिठ्ठी हातात सोपवली. यानंतर सचिनला AB+ च्या जागी O+ रक्त देण्यात आलं.
दरम्यान कुटुंबाने किंवा रुग्णालय प्रशासनाने अद्याप याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याआधी 2022 मध्ये अशीच एक घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये डेंग्यूच्या एका रुग्णाला प्लाझ्माऐवजी 'मोसंबी' ज्यूस दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुग्णालय सील करण्यात आलं होतं आणि यूपी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.