बॉयफ्रेंडसाठी तरुणाने केलं सेक्स चेंज ऑपरेशन, पण घडलं भलतंच; अखेर गाठावं लागलं पोलीस स्टेशन

मी सर्जरीवर खूप पैसे खर्च केले होते. पण आता माझ्या वाट्याला फक्त दु:ख आहे. मी कठोर कारवाईची मागणी करत आहे असं पीडित तरुणाने म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 22, 2024, 02:02 PM IST
बॉयफ्रेंडसाठी तरुणाने केलं सेक्स चेंज ऑपरेशन, पण घडलं भलतंच; अखेर गाठावं लागलं पोलीस स्टेशन title=

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. याचं कारण प्रेमात योग्य काय आणि चुकीचं काय हे समजत नाही. प्रेमात असताना आपण जे काही करतो तेच अंतिम सत्य आहे असं वाटत असतं. पण नंतर जेव्हा आपली चूक लक्षात येते तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मध्य प्रदेशातील एका 28 वर्षीय तरुणावर अशीच वेळ आली आहे. अखेर त्याला पोलीस स्टेशन गाठावं लागलं असून, आपल्या प्रियकराविरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागली आहे. 

तरुणाने आपल्या पुरुष प्रियकराशी लग्न करण्यासाठी थेट सेक्स चेंज ऑपरेशन केलं होतं. पण इतकं करुनही त्याने मात्र लग्नास नकार दिला. यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत कारवाईची मागणी केली. वैभव शुक्ला असं आरोपीचं नाव असून, तो उत्तर प्रदेशचा आहे. आरोपानुसार त्याने ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ऑपरेशन केल्यानंतर त्याने नकार दिला. 

पीडित तरुणाने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची वैभव शुक्लाशी पहिल्यांदा भेट झाली होती. यावेळी त्याने जर तू सर्जरी केलीस तर लग्न करेन असं आश्वासन दिलं होतं. पण सर्जरी केल्यानंतर वैभव शुक्लाने शब्द फिरवला आणि लग्नास नकार दिला. ज्यामुळे पीडित तरुण नैराश्यात गेला होता. 

पीडित तरुणाने पोलिसांना सांगितलं की, "मी वैभव शुक्लाच्या सांगण्यानुसार सेक्स सर्जरी केली. त्याने मला लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्याने फक्त नकारच दिला नाही तर अनैसर्गिक कृत्य करण्यासही भाग पाडलं".

यानंतर पीडित तरुणाकडे पोलिसांकडे मदत मागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांने विजन नगर पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. यावेळी त्याने आपल्यावर आलेला आर्थिक भार सांगत कडक कारवाई करण्याची मागणी केली. "सर्जरीवर मी बराच पैसा खर्च केला असून आता पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी," असं त्याने म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि वैभव शुक्ला इंस्टाग्रामवरुन संपर्कात आल्यानंतर जवळपास 3 वर्षं नात्यात होते. दरम्यान वैभव शुक्लाने लग्नासाठी नकार दिल्यानंतर पीडित तरुणाला धमकीही दिली होती. 

"आरोपी पीडित तरुणासह अनैसर्गिक कृत्य करत होता. कलम 377 आणि 506 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत," असं विजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रभाल सिंग म्हणाले आहेत. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत.